

Jalna Police constable arrested in bribery case
जालना : हाणामारीच्या प्रकरणात जबाब घेण्यासाठी वापरलेल्या खासगी वाहनाच्या खर्चापोटी आणि तपासात मदत करण्यासाठी चार हजार रुपयांची लाच स्वीकारणारा पोलिस हवालदार सापळा पथकातील एकाने हाताची बाही वर करताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. ही कारवाई बुधवार दि. ९ रोजी मंठा येथील तहसील मार्गावर असलेल्या एका हॉटेलात करण्यात आली.
दरम्यान, तक्रारदाराचे गावातील एका व्यक्तीसोबत १५ जून भांडण झाले होते. हाणामारीत ते जखमी झाले होते. जालना येथील रुग्णालयात उपचार घेत असताना पोलिस हवालदार राजू परसराम राठोड, (४४), मंठा पोलिस ठाणे हे त्यांचा जबाब घेण्यासाठी जालना येथे खासगी वाहनाने आले होते. त्या वाहनाचा खर्च १,५०० रु व तपासात मदत करण्यासाठी ३,००० रु. असे एकूण ४,५०० रुपयांची लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली.
या तक्रारीची ८ जुलै रोजी तक्रारदार व पंच यांच्या समक्ष पोलिस हवालदार राठोड यांच्याकडे पाठवून पडताळणी केली. यावेळी राठोड यांनी तक्रारदार यांच्याकडे ४,५०० रुपयांची लाचेची मागणी करून तडजोडी अंती ४ हजार रुपये स्वीकारण्याचे कबूल केले. यामुळे लाचलुचत प्रतिबंधक विभागाच्यावतीने बुधवार दि. ९ रोजी तक्रारदार यांचेकडून तहसील रोड मंठा येथील हॉटेल समृद्धी बार समोर पंचासमक्ष लाचेची रक्कम ४ हजार रुपये स्वीकारली.
यावेळी राठोड यांची सापळा पथकाकडून अंग झडती घेण्यात आली. आरोपीचा मोबाईल जप्त करण्यात आला. या प्रकरणी मंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिस अधीक्षक माधुरी केदार कांगणे, उप अधीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलिस उप अधीक्षक बाळू एस. जाधवर, सहायक सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक शरदचंद्र रोडगे, सापळा पथकातील पो. हा. भालचंद्र बिनोरकर, गजानन घायवट, पो. अम. गणेश चेके, गजेंद्र भुतेकर, मनोहर भुतेकर, अमोल चेके, शिवलिंग खुळे, गजानन खरात आदींनी केली.
लाचेची रक्कम स्वीकारताना पोलिस हवालदार राठोड यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा सापळा पडला असल्याची भणक लागली. त्याने सापळा पथकास पाहताच बारमध्ये पळण्याचा प्रयत्न केला. खिशातील लाचेची रक्कम खाली फेकून दिली. परंतु सापळा पथकाने त्यास बारमध्ये ताब्यात घेऊन लाचेची रक्कम पंचासमक्ष जप्त केली