अमरावती, पुढारी वृत्तसेवा : चिखलदरा येथे घाट वळणावर दोन कारची समोरासमोर धडक होवून अपघात झाला. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी (दि.20) घडली. चिखलदरा परिसरातील मार्गांवर पावसामुळे दाट धुके पसरले आहे. या धुक्यामुळे समोरील वाहन न दिसल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
शनिवारी नागपूरमधील सावनेर येथील काही पर्यटक कारने चिखलदरा येथे पर्यटनासाठी आले होते. चिखलदरा येथील जत्रा डोहाकडे जाताना मरियमपूर गावाजवळ समोरून येणाऱ्या कारने त्यांच्या वाहनाला धडक दिली. त्यामुळे या अपघातात मोहित राजू पारधी (वय.24) हा युवक गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी चिखलदरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेले अन्य चार ते पाच जण देखील जखमी असल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच चिखलदरा पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा करून दोन्ही कार ताब्यात घेतल्या आहेत.
पावसाळ्याच्या दिवसात चिखलदरा परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. मात्र येथील धुक्याचे वातावरणामुळे अनेकदा वळणाच्या मार्गावर समोरून येणारे वाहन दिसत नाही. त्यामुळे अनेकदा अपघात होतो. येथे घाट वळणाचे रस्ते असल्यामुळे वाहन चालकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.