अमरावती : १०० रुपये मागितल्यानंतर केवळ २० रुपयेच हाती दिल्याचे पाहून रागाच्या भरात एका तरुणाचा धारदार शस्त्रांनी खुन करण्यात आला. ही घटना अमरावती शहरातील चित्रा चौकाजवळील मोची गल्लीसमोर मंगळवारी (दि.१५) रात्री घडली. निशांत ऊर्फ गोलू सुनिल उसरटे (वय ३४, रा. रतनगंज, नागपुरी गेट) असे मृतक तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर आरोपींना अटक करावी या मागणीसाठी बुधवारी (दि.१६) सीटी कोतवाली पोलिस ठाण्यासमोर मृतक युवकाच्या नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर कोतवाली पोलिसांनी आरोपींना अटक केल्याचे आश्वासन दिल्यावर नातेवाईकांचा रोष शांत झाला. याप्रकरणात पोलिसांनी विक्की परशुराम गुप्ता (वय ३०, रा. रतनगंज), योगेश गजानन गरुड (वय ३२, रा. विलासनगर), कमल रमेश साहु (वय ३२, रा. रतनगंज) या आरोपींना अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार रतनगंज परिसरातील एका दुर्गा मंडळाची मुर्ती कौंडण्यूपर येथे विसर्जनासाठी नेण्यात आली होती. दरम्यान तेथे गेलेल्या दोन ते तीन तरुणांचा परत अमरावती येताना रात्री अपघात झाला. त्यानंतर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले.दरम्यान अपघात झालेल्या तरुणांना पाहण्यासाठी आरोपी गेले होते. त्यानंतर तेथून परत काही वेळाने ते रतनगंजकडे जात असताना, त्यांना चित्रा चौकातील मोची गल्लीजवळ निशांत उसरटे भेटला. त्यावेळी आरोपींनी त्याला १०० रुपये मागितले. परंतू त्याने २० रुपये दिले. त्यामुळे आम्हाला भिकारी समजला का, असे म्हणून आरोपींनी निशांतसोबत वाद घातला. त्यानंतर आरोपींनी निशांतवर धारदार शस्त्रांनी हल्ला करून त्याला जीवानिशी ठार केले. या घटनेच्या माहितीवरून कोतवाली पोलिसांनी जखमी निशांतला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. येथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. या घटनेची माहिती शहरात पसरताच, मृताचे नातेवाईक, मित्रमंडळी आणि समर्थकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली. त्यामुळे रुग्णालय परिसरात दिडशे ते दोनशे नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. अशातच मृतक युवकाच्या नातेवाईकांनी व परिसरातील नागरिकांनी रुग्णालय परिसरात रोष व्यक्त केला. त्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला होता. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अकोला येथून तर अन्य दोन आरोपीला इतर ठिकाणावरून अटक केली आहे.