झोपेतून उठला अन् ८ नशेच्या गोळ्या खाऊन एकाच घावात केला तरुणाचा खून

भाईगिरी टोकाला : गुन्हेगारांवरील पोलिसांचा वचक संपला
murder News
मृत अमोल दाभाडे आणि संशयित आरोपी नीलेश चव्हाणPudhari Photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : एकदाच ८ बटन गोळ्या खाऊन नशेखोराने एका घावातच तरुणाचा खून केला. ही धक्कादायक घटना गल्ली क्र. २, विश्रांतीनगर भागात बुधवारी (दि.१६) ऑक्टोबर सकाळी ११ वाजता घडली. धक्कादायक म्हणजे, इतर तरुणांनी जागेवरच आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र, चाकूचा धाक दाखवून तो पळून गेला. पुंडलिकनगर पोलिसांनी त्याला पकडले. शहरात टवाळखोरांच्या भाईगिरीने टोक गाठले असून गल्लीबोळांतील या छपरी दादांनी आठ दिवसांत तिघांचा बळी घेतला. पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक संपत चाललाय का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अमोल उर्फ नंदू संतोष दाभाडे (२१, रा. विश्रांतीनगर), असे मृताचे तर नीलेश सुभाष चव्हाण (१९, रा. रेल्वे पटरीजवळ, शिवशाहीनगर), असे आरोपी तरुणाचे नाव आहे.

अधिक माहितीनुसार, १६ आॅक्टोबरला सकाळी ११ वाजेच्या सुमारास अमोल हा त्याचे मित्र दीपक, अक्षय, बाळू, राहुल आणि राजू गायकवाड आदींसोबत विश्रांतीनगर गल्ली क्र. २ मधील हनुमान मंदिरात गप्पा मारत बसले होते. त्याचवेळी आरोपी नीलेश चव्हाण हा त्याचा मित्र कुणालसोबत तेथे आला. त्याने अमोल दाभाडेला बाहेर बोलावले. अमोलने थांब थोडा वेळ, मी लगेच बाहेर येत नाही. थोड्या वेळाने जेवण करून येतो, असे त्याला सांगितले. मात्र, नीलेशने बाहेर चल, आपल्याला बोलायचे आहे म्हणून त्याला बळजबरी बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अमोल जागेवरच उभा राहिला. त्याचवेळी नीलेश चव्हाणने अचानक खिशातून धारदार चाकू काढला आणि कोणाला काही कळण्याच्या आत अमोल दाभाडेच्या छातीत खुपसला. दुसरा घाव घालू नये म्हणे अमोलने लगेचच नीलेशला मिठी मारून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही क्षणात अमोल खाली कोसळला. तेथे हजर तरुणांनी आरोपी नीलेशला पकडण्याचा प्रयत्न केला असता सर्वांना चाकूचा धाक दाखवून तो पळून गेला. तरुणांनी अमोलला एन-४ मधील खासगी रुग्णालयात नेले. तेथे उपचार सुरु असताना अमोलचा मृत्यू झाला. या प्रकरणी अमोलच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार

चाकूहल्ल्याच्या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक कुंदन जाधव यांनी उपनिरीक्षक रेशीम कोळेकर, सहायक उपनिरीक्षक सुनील म्हस्के, अंमलदार विजय लकवाल, दीपक जाधव यांच्या पथकाला घटनास्थळी रवाना केले. त्यांनी पळून गेलेला आरोपी नीलेश चव्हाणला शोधून ताब्यात घेतले. तो रेकॉर्डवरील आरोपी आहे. मंगळसूत्र चोरीच्या गुन्ह्यात पुंडलिकनगर पोलिसांनीच त्याला चार महिन्यांपूर्वी अटक केली होती. तो १५ दिवस हर्सूल जेलमध्ये होता.

आठ दिवसांतील खुनाच्या घटना

पहिली घटना - उस्मानपुरा

८ ऑक्टोबर २०२३ रोजी आरोपी निखिल गीताराम शिंगाडे याच्यावर नागसेननगरात तरुणांच्या टोळक्याने हल्ला केला. त्यात तो गंभीर जखमी होता. सहा महिन्यांनी तो बरा झाला. त्या हल्लेखोरांना इशारा देण्यासाठी बरोबर एक वर्षाने ८ ऑक्टोबर २०२४ रोजी निखिल शिंगाडेने नागसेननगरात अशोक दादाराव शिनगारे (४६) यांना गाठले आणि त्यांच्यावर चाकूने २२ वार करून निर्घृण खून केला.

दुसरी घटना - बेगमपुरा

पोलिसांत तक्रार का केली म्हणून ऋतिक ऊर्फ छोटू चव्हाण, जिता टाक, ऋषी चव्हाण, पूनम विजय चव्हाण (सर्व रा. पहाडसिंगपुरा) या चौघांसह दोन अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने १५ आॅक्टोबरच्या रात्री साडेअकरा वाजता विद्यापीठ गेटजवळील जयसिंगपुरा येथे सुमित काशिनाथ जावळे (१७) या तरुणाला गाठून भावाच्या समोर चाकूने भोसकून संपविले. धक्कादायक म्हणजे, यातील एका आरोपीला चाकू घेऊन फिरताना चार दिवस आधी पोलिसांनी पकडले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news