अमरावतीत दिवसागणिक एका शेतकरी संपवतोय जीवन

अमरावतीत दिवसागणिक एका शेतकरी संपवतोय जीवन

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. सर्वाधिक आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी विदर्भातील यवतमाळची नोंद आहे. दुर्दैवाने, यवतमाळपेक्षाही जास्त आत्महत्या आता शेजारील अमरावती जिल्ह्यात होत आहेत. यावर्षीच्या मे महिन्यापर्यंतच्या आकडेवारीनुसार अमरावतीतील 143 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या असून, दरदिवशी एक असे हे प्रमाण आहे.

कापूस आणि सोयाबीन उत्पन्नाचा या पट्ट्यात आत्महत्यांचे प्रमाण कमी होत नसल्याचे चित्र आहे. या वर्षातील आतापर्यंतच्या शासकीय आकडेवारीनुसार अमरावतीत सर्वाधिक 143 आत्महत्यांची नोंद झाली आहे. या पाठोपाठ यवतमाळ जिल्ह्यात 132 शेतकर्‍यांनी आत्महत्या केली आहे. शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत गेल्या काही वर्षांपासून अमरावतीत सर्वाधिक आकडा नोंदवला गेला आहे. या वर्षी मेअखेरपर्यंतच या जिल्ह्यात 143 शेतकर्‍यांनी टोकाचे पाऊल उचलले.

गेल्यावर्षी म्हणजे 2023 मध्ये 323 शेतकर्‍यांच्या आत्महत्यांची नोंद झाली होती, तर 2022 साली हा आकडा 349 व 2021 मध्ये 370 असा होता. याच कालावधीत यवतमाळ जिल्ह्यातही 2021 मध्ये 290, 2022 मध्ये 291 व 2023 मध्ये 302 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या होत्या.

राज्य सरकारने 2021 पासून विदर्भातील सहा जिल्ह्यांतील शेतकरी आत्महत्यांच्या नोंदी ठेवण्यास सुरूवात केली आहे. यात अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलढाणा आणि वर्धा जिल्ह्यांचा समावेश आहे. गेल्या दोन दशकात तब्बल 22 हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केली आहे. दरम्यान, विदर्भाप्रमाणेच दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील आत्महत्यांचीही नोंद प्रशासनाकडून ठेवली जात आहे. मात्र, दुष्काळी मराठवाड्यातील आत्महत्यांचे प्रमाण विदर्भाच्या तुलनेत कमी आहे, तर एप्रिल 2024 पर्यंतच्या आकडेवारीनुसार मराठवाड्यातील सर्व आठ जिल्ह्यांत मिळून 267 आत्महत्यांची नोंद झाली आहे. शेतकरी आत्महत्यांच्या तपासासाठी जिल्हास्तरीय समित्या आहेत.

शेतकरी नेते आणि वसंतराव नाईक शेतकरी स्वालंबन अभियानाचे माजी संचालक किशोर तिवारी यांनी अमरावतीतील स्थिती भीषण असल्याचे म्हटले आहे.

अमरावतीतील यंदाच्या 143 पैकी 33 आत्महत्या या शेतकी कारणांमुळे झाल्या. तर, दहा आत्महत्यांची प्रकरणे शेतकी संबंधित नसल्याने नाकारण्यात आली. शंभर प्रकरणांबाबत तपास सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील 132 पैकी 34 आत्महत्या या शेतकी कारणांमुळे झाल्या. 66 प्रकरणांचा तपास सुरू असून 32 प्रकरणे नाकारण्यात आली आहेत.

शेतकी समस्येमुळे आत्महत्या झाल्यास मृतांच्या नातेवाइकांना एक लाख रूपयांचा निधी दिला जातो. कर्जबाजारीपणा, कर्जाच्या वसुलीचा तगादा, नापिकी, पीक वाया जाणे किंवा शेतीसंबंधी अन्य कारणांमुळे आत्महत्या झाल्याचे आढळून आल्यास हा मदतनिधी दिला जातो.

गेल्या चार वर्षांत शेतकी कारणांमुळे आत्महत्यांचे प्रमाणही अमरावतीत जास्त असल्याचे आढळून आले आहे. गेल्या चार वर्षांत एक हजारापैकी साडेसातशे शेतकर्‍यांनी शेतीसंबंधित कारणामुळे आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे, तर याच कालावधीत यवतमाळ जिल्ह्यातील 800 पैकी चारशे शेतकर्‍यांच्या आत्महत्या शेतीशी निगडित असल्याचे आढळले आहे.

चांगल्या उत्पन्नासाठी शेतकरी सोयाबीन उत्पन्नाकडे वळला. मात्र, उत्पादनात घट झाली असतानाच सोयाबीनचे दरही प्रतिक्विंटल चार हजारांपर्यंत खाली आले. बँकां योग्य कर्जवाटप करीत नसल्याने छोट्या पतसंस्था किंवा सावकारी कर्जाशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे वसुलीचा तगादा शेतकर्‍यांना सहन करावा लागतो.

– किशोर तिवारी, शेतकरी नेते

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news