शेगावला दर्शनासाठी जाताना भीषण अपघात, कारचालकाचा मृत्यू, ३ युवक गंभीर जखमी | पुढारी

शेगावला दर्शनासाठी जाताना भीषण अपघात, कारचालकाचा मृत्यू, ३ युवक गंभीर जखमी

अमरावती; पुढारी वृत्तसेवा शेगाव येथे गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाताना भाविकांच्या कारला भीषण अपघात झाला. या अपघातात कारचालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून अन्य तीन युवक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हा अपघात रविवार पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास दर्यापूर-शिंगणापूर मार्गावर झाला. भरधाव ट्रकने भाविकांच्या कारला जोरदार धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातामध्ये कारचालक प्रज्वल संजय देशमुख (वय २३) यांचा जागीच मृत्यू झाला तर गौरव जायले (२०), अर्पित धावले (१९) व सर्वज्ञ आंबुलकर (१८) हे तीन युवक गंभीर जखमी झाले आहेत. जखमी युवकांना उपचारासाठी अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शेगाव येथे गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त अमरावती येथून दर्यापूर मार्गे आपली कार क्रमांक एम एच 43 एएन 2937 ने चारही भाविक युवक जात होते. दरम्यान दर्यापूर-शिंगणापूर मार्गावर त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर जखमींना आधी शासकीय रुग्णवाहिकेने दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर गंभीर असलेल्या युवकांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती खल्लार पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

हेही वाचा :

Back to top button