शेतकरी संकटात अन् सरकार इव्हेंट करण्यात गुंतलंय : जयंत पाटील | पुढारी

शेतकरी संकटात अन् सरकार इव्हेंट करण्यात गुंतलंय : जयंत पाटील

अमरावती, पुढारी वृत्तसेवा: एकीकडे संपूर्ण राज्यासह विदर्भातील शेतकरी संकटात आहे. तर सरकार मात्र इव्हेंट करण्यात गुंतले आहे, अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. अमरावती येथे शरद पवार गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर नेहरू मैदानात आज (दि.५) ट्रॅक्टरसह जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यादरम्यान जयंत पाटील माध्यमांशी बोलत होते.

आधी दुष्काळ आणि आता अवकाळी पावसाने शेतकरी संकटात आहे. यापूर्वी दिवाळीच्या आधी दिवाळी गोड करू म्हणून सरकारच्या वतीने कृषिमंत्री यांनी आश्वासन दिले होते, ते अध्यापही पूर्ण झाले नाही. कापसाचे दर सहा सात हजारांच्या वर जायला तयार नाहीत. कापसाला किमान 14 हजार आणि सोयाबीनला 8 हजार भाव मिळावा, अशी मागणी येत्या अधिवेशनात केली जाणार आहे. विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या मोठ्या आहेत. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाला घेऊनच आम्ही हा मोर्चा काढला आहे, असेही पाटील यावेळी म्हणाले.

मोर्चामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख, आमदार रोहित पवार, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे आदींची उपस्थिती होती. या मोर्चातून शेतकरी, कामगार, विद्यार्थी, बेरोजगार युवकांसह सध्याच्या ज्वलंत प्रश्नावर शरद पवार गट आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा असल्याने पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोर्चात शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरसह घेतलेला सहभाग विशेष होता. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह काही समविचारी पक्ष व संघटनांनी देखील या मोर्चाला पाठिंबा दिला होता. दरम्यान राज्य सरकार व केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

हेही वाचा 

Back to top button