अमरावती : पोलिसांवर दगडफेक; चौघांना ६ महिन्याचा कारावास

अमरावती : पोलिसांवर दगडफेक; चौघांना ६ महिन्याचा कारावास
Published on
Updated on

अमरावती, पुढारी वृत्तसेवा :  शासकीय कामात अडथळा निर्माण करून पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या चार आरोपींना अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाने ६ महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. महेश चोहितराम जिवतानी (५५), मुकेश चोहितराम जिवतानी (५०), जय चंद्रलाल शर्मा (३८) व विक्की चंद्रलाल बत्रा (३४, सर्व रा. लुल्ला गल्ली, रामपूरी कॅम्प, अमरावती) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. २६ ऑक्टोंबर २०१४ रोजी गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती.

रामपूरी कॅम्प येथे काही लोकांनी एका इसमाची दुचाकी जाळली होती. वाद वाढू नये म्हणून २६ ऑक्टोंबर २०१४ रोजी पोलीस मुख्यालयाचे कर्मचारी विशाल ज्ञानेश्वर खानंदे व त्यांच्यासोबत आरसीपी प्लॉटूनमधील इतर कर्मचारी हे शासकीय वाहनाने रामपूरी कॅम्प भागात पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान रात्री ११ वाजताचे दरम्यान रामपूरी कॅम्पच्या लुल्ला लाईन भागात काही नागरिक एकत्रित जमलेले होते. त्यावेळी पोलिसांनी त्या नागरिकांना घरी जाण्यास सांगितले असता, काही नागरिक घरी निघून गेले, तर दहा ते बारा नागरिक हे पोलीसांजवळ आले. तुम्ही आम्हाला त्रास कशाला देता ? असे म्हणून त्या नागरिकांनी पोलिसांना शिवीगाळ केली.
पोलिसांनी त्यांना समजावून सांगितले असता त्यामधील काही लोकांनी पोलीसांच्या दिशेने दगडफेक केली. त्यामुळे पोलीस शिवीगाळ व दगडफेक करणाऱ्या नागरिकांना पकडण्यास धावले. त्यावेळी ते नागरिक वॉल कम्पॉउंड व नाल्यामधून उड्या टाकून पळून गेले. त्यापैकी चारही आरोपींना पोलिसांनी पकडून ताब्यात घेतले. सदर घटनेची तक्रार पोलिस कर्मचारी विशाल ज्ञानेश्वर खानंदे यांनी गाडगे नगर ठाण्यात नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी चारही आरोपीतांविरुध्द गुन्ह्यांची नोंद केली.
सदर प्रकरणात सत्र न्यायालयात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता यांनी सहा साक्षीदार तपासले. त्यानंतर दोन्ही पक्षाचा युक्तीवाद झाला. न्यायालायाने अतिरीक्त सरकारी अभियोक्ता रणजीत ना. भेटाळू यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन चारही आरोपींना दोषी ठरविले. या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्रमांक ३) राजेंद्र व्ही. ताम्हाणेकर यांच्या न्यायालयाने चारही आरोपीतांस दोषी ठरवीत भादंविची कलम १४३ नुसार प्रत्येकी १ महिना सश्रम कारावास व प्रत्येकी १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ७ दिवस साधा कारावास, भादंविची कलम ३५३ सहकलम १४९ नुसार प्रत्येकी ६ महिने सश्रम कारावास व प्रत्येकी २ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवसांचा साधा कारावास, कलम ३३६ सहकलम १४९ नुसार प्रत्येकी २५० रुपयांचा दंड व दंड न भरल्यास ३ दिवस साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली. सदर प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हवालदार बाबाराव मेश्राम व एनपीसी अरुण एम. हटवार, यांनी पोलिस विभागाकडून कामकाज पाहिले.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news