Amravati : मेळघाटात पक्ष्यांच्या दहा नवीन प्रजातींची भर : २१० प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद

Amravati : मेळघाटात पक्ष्यांच्या दहा नवीन प्रजातींची भर : २१० प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद
Published on
Updated on

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातर्फे २६ ते २९ जानेवारी दरम्यान करण्यात आलेल्या पहिल्या पक्षी सर्वेक्षणात पक्ष्यांच्या २१० प्रजातींची नोंद घेण्यात आली. त्यात मेळघाटात आढळणा-या पक्ष्यांच्या यादीत नव्याने १० प्रजातींची भर पडली आहे. महाराष्ट्राबरोबरच मध्यप्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, प. बंगाल, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळ व जम्मू आणि काश्मीर आदी १० राज्यांतील एकूण ६० पक्षी अभ्यासक सर्वेक्षण मोहिमेत (Amravati) सहभागी झाले होते.

अकोट वन्यजीव विभागातील शहानूर येथे सर्वेक्षणाचा शुभारंभ (Amravati) झाला. तिथून सर्व सहभागींपैकी प्रत्येकी दोन निरीक्षक याप्रमाणे ३० पथके मेळघाटातील चार विभागांत विविध ठिकाणी रवाना झाली. सर्वेक्षणाच्या पहिल्या व दुस-या दिवशी प्रत्यक्षात पक्षी अभ्यास व नोंदणी करण्यात आली. त्यानंतर या सर्व माहितीची ई-बर्ड या संकेतस्थळावर तसेच प्रपत्रांमधे लिखित स्वरुपात नोंद करण्यात आली.

प्राथमिक माहितीनुसार, यापूर्वी नोंद झालेल्या २९४ पक्षी प्रजातीपैकी सुमारे २१३ प्रजातींचे पक्षी नोंदविण्यात आले आहेत. या अभ्यासातून या पक्ष्यांची संख्या व काही पक्षी प्रजातींची सद्य:स्थिती कळण्यास मदत होणार आहे. सर्वेक्षणात मेळघाटच्या यादीत यापूर्वी समाविष्ट नसलेले सुमारे १० प्रजातींचे पक्षी प्रथमत:च नोंदविण्यात आले. या नवीन नोंदीमुळे मेळघाटातील पक्ष्यांची यादी तीनशेवर पोहोचली आहे.

मेळघाटात प्रथमच नोंदविण्यात आलेल्या पक्ष्यांमधे हिमालयन रुबीथ्रोट, गुलाबी गोमेट, लांब शेपटीचा गोमेट, काश्मिरी माशीमार, सोनेरी डोक्याचा वटवट्या, रेषाळ गळ्याचा सुतार, मोठा राखी खाटिक व काळ्या पंखाचा कोकिळ खाटिक हे काही दुर्मिळ पक्षी, तसेच शेंडी बदक व तरंग बदक या सारखे स्थलांतरित पाणपक्षी नोंदविण्यात आले आहेत.

मेळघाटचे वैभव असलेला रानपिंगळा अनेक पक्षी अभ्यासकांसाठी आकर्षण ठरला. हा पक्षी सर्वेक्षणात अनेक ठिकाणी आढळून आला. तो अनेकांना प्रथमच बघायला मिळाला. मेळघाटात प्रथमच आढळून आलेले पक्षी हे मेळघाटातील पुनर्वसन झालेल्या गावठाण क्षेत्रातील विकसित झालेल्या गवताळ अधिवासात आढळून आले आहेत. मेळघाटमधून २० वर्षांपूर्वी पुनर्वसन झालेल्या कुंड या ठिकाणी पक्षी अभ्यासक मिलिंद सावदेकर व सामिष डोंगळे यांना गुलाबी गोमेट, लांब शेपटीचा गोमेट, काश्मिरी माशीमार हे तीन पक्षी आढळून आले. हिमालयन रूबीथ्रोट या सुंदर पक्ष्याची नोंद ले. क. रोहित शर्मा यांनी वान अभयारण्यातील बारुखेडा या ठिकाणी घेतली.

Amravati पक्ष्यांसाठी संपन्न अधिवास

रेषाळ गळ्याचा सुतार, मोठा राखी खाटिक या दोन पक्ष्यांची नोंद केळपाणी या पुनर्वसित गावाच्या परिसरात डॉ. पवन राठोड व आमोद गवारीकर यांनी घेतली. काळ्या पंखाचा कोकिळ खाटिक (Black-winged Cuckoo Shrike) या पक्ष्याची नोंद चैतन्य दुधाळकर यांनी घेतली. या भागातील बारुखेडा, तलई, केळपाणी, सोमठाणा, धारगड, गुल्लरघाट आदी गावांचे मागील १० वर्षापूर्वी पुनर्वसन झाल्यानंतर या ठिकाणी वन्यप्राण्यांसाठी व पक्ष्यांसाठी संपन्न असे अधिवास निर्माण झाले आहेत. या ठिकाणी रानपिंगळा, स्थलांतरित आखूड कानाचे घुबड, निळ्या डोक्याचा कस्तुर असे अनेक दुर्मिळ पक्षी आढळून आले. या सर्व नोंदीवरून मेळघाटातील पक्षी विश्व संपन्न असल्याचा निष्कर्ष आहे. सर्व सहभागींकडून प्राप्त माहिती व छायाचित्रांवरून प्रकल्पाद्वारे विश्लेषणात्मक अभ्यास होत आहे.

प्रकल्पाच्या क्षेत्र संचालक जयोती बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनात आणि मेळवाटच्या गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक सुमंत सोळंके, सिपना वन्यजीव विभागाच्या उपवनसंरक्षक दिव्या भारती व अकोट वन्यजीव विभागाच्या सहा. वनसंरक्षक आर्या यांच्या सहकार्याने मोहिम पार पडली. या आयोजनासाठी गठित समितीतील विभागीय वन अधिकारी मनोजकुमार खैरनार, वन परिक्षेत्र अधिकारी योगेश तापस, तसेच मानद वन्यजीव रक्षक डॉ. जयंत वडतकर, प्रा. डॉ. सावन देशमुख तसेच विविध अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी प्रा. डॉ. निशिकांत काळे, डॉ. गजानन वाघ, अमोल सावंत, मिलिंद सावदेकर, किरण मोरे, स्वप्नील बांगडे, अतुल तिखे. तसेच ई- बर्डचे तेजस पारशिवणीकर व शहानूर येथील अधिकारी हर्षली रिठे यांनी विशेष परिश्रम घेतले.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news