

अकोला, पुढारी वृत्तसेवा : प्रादेशिक हवामान विभागाच्या नागपूर केंद्रात जिल्ह्यात पुढील काळात उष्णतेची लाट (Heatwave) येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्या अनुषंगाने नागरिकांनी उन्हाचा धोका टाळण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. (Nagpur Weather Update)
तहान लागलेली नसली तरी जास्तीत जास्त पाणी प्यावे. हलके, पातळ, सच्छिद्र सुती कपडे वापरावे. बाहेर पडताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट, चपला वापराव्यात. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी. उन्हात काम करताना टोपी, रूमाल, दुपट्टा वापरावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरची लस्सी, ताक, कैरीपाणी, पन्हे, निंबूपाणी आदींचा वापर करावा. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम आदी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत. चक्कर आल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पशुधन, पाळीव प्राण्यांना छावणीत ठेवावे. त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी. घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर, सनशेडचा वापर करावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. कार्यालयांनी थंड पेयजलाची व्यवस्था ठेवावी. गरोदर महिला, कामगार, आजारी कामगारांची अधिक काळजी घ्यावी. उष्माघाताची लक्षणे दिसताच दवाखाना गाठावा.
लहान मुले, तसेच पाळीव प्राण्यांना दरवाजे बंद असलेल्या वाहनात. तसेच पार्क केलेल्या वाहनात ठेवू नका. दु. १२ ते ३.३० या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाकाची कामे टाळावीत. मोकळ्या हवेसाठी स्वयंपाकघराची दारे, खिडक्या उघड्या ठेवाव्यात. उच्च प्रथिनयुक्त आहार व शिळे अन्न खाऊ नये. मद्यसेवन, चहा, कॉफी, कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक घेऊ नये. त्यामुळे निर्जलीकरण होऊ शकते. उन्हात वाहने चालवू नयेत. ज्वलनशील पदार्थांपासून शक्यतो दूर राहावे.