

पुणे: यंदाचा फेब्रुवारी गेल्या 125 वर्षांतील सर्वांत उष्ण महिना ठरला आहे. या महिन्यात सरासरी पाऊसही पन्नास टक्क्यांपेक्षा कमी पडला. कारण, फेब्रुवारीत सर्वांत कमी दाबाचे पट्टे आणि पश्चिमी विक्षोभ कमी तयार झाले. त्यामुळे पाऊस आणि थंडी कमी
पडली, असे निरीक्षण हवामानतज्ज्ञांनी नोंदविले आहे. दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असली, तरी हवामान बदलामुळे नाशिक जिल्ह्यात निफाडला ऐन उन्हाळ्यात कडाक्याची थंडी पडली आहे.
भारतीय हवामान विभागाने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार, दक्षिण द्विपकल्पीय भारत आणि मध्य भारतात परिस्थिती अधिक गंभीर होती. तर पूर्व, ईशान्य आणि वायव्य भारतात ती थोडीशी बरी स्थिती आढळून आली. हवामानतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, 2025 सालातील फेब्रुवारी 125 वर्षांतील सर्वांत उष्ण महिना गणला गेला. स्थानिक घटकांसह फेब्रुवारी 2025 मध्ये पश्चिमी विक्षोभांचा अभाव होता. त्यामुळे पाऊस आणि थंडी कमी पडली. त्यामुळे फेब्रुवारी कोरडा तर गेलाच; शिवाय थंडीही कमी पडली.
तापमान दीड अंशांने जास्त
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी 2025 हा महिना 1901 नंतरचा सर्वांत उष्ण महिना ठरला. त्या महिन्याचे सरासरी तापमान 29.7 अंश होते. फेब्रुवारी 1901 पासूनचे हे दुसरे सर्वोच्च कमाल तापमान नोंदविले गेले. फेब्रुवारीच्या सरासरी तापमानात दीड अंशाने वाढ झाली आहे.
फेब्रुवारीत कमी पाऊस
हवामान विभागाच्या नोंदीप्रमाणे देशात जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात सरासरीच्या 89.3 टक्के पाऊस पडतो. मात्र, यंदा सुमारे 50 टक्के कमी पाऊस पडला. त्याचा परिणाम थंडीवरही झाला. फेब्रुवारीत यंदा थंडीच पडली नाही. त्यामुळे कमाल तापमानात मोठी वाढ दिसून आली. यंदा फेब्रुवारीतच उष्णतेच्या लाटा सुरू झाल्या.
निफाडला 4.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
लासलगाव : यंदा मार्चपासूनच तीव्र उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली असताना, हवामान बदलाचा वेगळाच परिणाम होताना दिसत आहे. निफाड तालुक्यात ऐन मार्चमध्ये थंडी परतली असून, कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात 4.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातही जवळपास अशीच स्थिती असून, दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री थंडी असा अनुभव येत आहे.
मार्चच्या दुसर्या आठवड्यात उष्णतेच्या लाटा
हवामानतज्ज्ञांच्या मते यंदा मार्चच्या दुसर्या आठवड्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र होईल, असा अंदाज आहे. यात राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगण, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडूच्या काही भागांसह देशाच्या बहुतेक भागांमध्ये सामान्यपेक्षा जास्त उष्णतेच्या लाटा सक्रिय होतील, असा अहवाल हवामान विभागाने दिला आहे.
पुणे, सोलापूर, रत्नागिरी 38 अंशांवर
राज्याच्या तापमानात किंचित घट झाली असली तरीही आर्द्रता वाढल्याने उष्मा मात्र कायम आहे. गुरुवारी सोलापूर, रत्नागिरी आणि पुणे शहरांतील लोहगावचा पारा 38 अंश सेल्सिअसवर गेला होता. तसेच मुंबई शहरदेखील तापले असून, पारा 35.3 अंशांवर गेला होता.
राज्यातील बहुतांश भागांत बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. त्यामुळे कमाल तापमान एक अंशाने घट झाली आहे. मात्र, उष्णतेचा निर्देशांक मात्र जास्त आहे. त्यामुळे एप्रिल-मे महिन्यासारखाच उष्मा मार्चमध्ये जाणवत आहे. गेल्या पाच दिवसांपासून
पुणे शहरातील कोरेगाव पार्क, लोहगाव आणि सोलापूरमध्ये सर्वोच्च तापमानात स्पर्धा सुरू आहे. गुरुवारी सोलापूर, रत्नागिरी आणि पुणे शहरांतील लोहगावचे तापमान राज्यात सर्वाधिक 38 अंश इतके नोंदले गेले.
गुरुवारचे कमाल तापमान
सोलापूर 38, लोहगाव (पुणे) 38, शिवाजीनगर (पुणे) 36.7, जळगाव 34.3, कोल्हापूर 36.2, महाबळेश्वर 32.7, मालेगाव 34, नाशिक 36, सांगली 37.4, सातारा 37, मुंबई 35.3, सांताक्रूज 35.5, अलिबाग 32.4, रत्नागिरी 38, डहाणू 31.6, धाराशिव 36, छ. संभाजीनगर 35.6, परभणी 35.4, बीड 35.9, अकोला 35.5, अमरावती 35.2, बुलडाणा 33.8, ब्रह्मपुरी 35.3, चंद्रपूर 35.4, गोंदिया 31.4, नागपूर 34.2, वर्धा 35.5, यवतमाळ 34.4
यंदा फेब्रुवारीत थंडी कमी पडली. कारण, उत्तर भारताकडून येणार्या शीत लहरींना मोठ्या प्रमाणावर राज्यात अटकाव झाला. दुसरे कारण फेब्रुवारीत राज्यात खूप कमी पाऊस झाला. त्यामुळे जमिनीची धूप लवकर वाढली. तिसरे कारण बंगालच्या उपसागराकडून बाष्पयुक्त वारे सतत येत असल्याने वाढलेले तापमान अन् बाष्प यांच्या संगमातून एकूण उष्मा जास्त वाढला. मार्चमध्येही पाऊस सरासरीपेक्षा कमी पडेल, असा अंदाज आहे. त्यामुळे हा महिना देखील उष्ण लाटांचा राहील, असे वाटते.
- डॉ. अनुपम कश्यपी, माजी हवामान विभागप्रमुख, आयएमडी, पुणे