

Purna taluka water supply issue
पूर्णा: तालुक्यातील अनेक गावांमध्ये जलजीवन मिशनअंतर्गत राबविण्यात आलेल्या ग्रामीण पाणीपुरवठा योजना आजही कार्यान्वित झालेल्या नाहीत. शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊनही प्रत्यक्षात पाणीपुरवठा सुरू न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. अभियंत्यांच्या हलगर्जीपणामुळे या योजनेचा बोजवारा उडाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
जलजीवन मिशन योजनेअंतर्गत गावागावात पाण्याच्या टाक्या, पाईपलाईन आणि नळजोडणीचे काम गुत्तेदारांकडून करण्यात आले. काही ठिकाणी ही कामे पूर्ण झाल्याचे सांगितले जाते, परंतु तरीही नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. अनेक ठिकाणी कामे कासवगतीने सुरू असून, काही गावांत तर ती वर्षानुवर्षे अपूर्णच आहेत. परिणामी, शासनाने दिलेला निधी वाया गेल्याचे चित्र दिसत आहे.
या योजनांचे नियंत्रण पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागातील अधिकाऱ्यांकडे असून, त्यांच्या दुर्लक्षामुळे बहुतेक गावांतील टाक्या आणि पाईपलाईन आज शोभेची वस्तू बनल्या आहेत. ‘हर घर जल’ या केंद्र व राज्य शासनाच्या घोषणेचा फक्त कागदावरच अंमल झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
गुत्तेदारांकडून अनेक ठिकाणी कामे अपूर्ण ठेवण्यात आली आहेत, तर जिथे कामे पूर्ण झालीत, तिथेही दररोज पाणीपुरवठा होत नाही. ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे चौकशीसाठी गेल्यावर उपविभागीय व कनिष्ठ अभियंते कार्यालयात हजर नसल्याचे वारंवार दिसते. अनेकदा त्यांच्या कक्षांना कुलूप असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी तात्काळ तपासणी करावी आणि पाणीपुरवठा नियमित सुरू करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.