

Leopard in Akot
अकोला : अकोट तालुक्यातील उमरा परिसरामध्ये रात्रीच्या वेळी बिबट्याचा मुक्तसंचार सुरू आहे. येथील नागरिकांना व वाहनचालकांना बिबट्या दिसत आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा आहे.
प्राप्त माहिती नुसार, उमरा परिसरातील जितापूर माऊली परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्या मुक्त संचार करीत असताना या परिसरातील अनेक नागरिकांना व वाहनचालकांना रस्त्यावर व परिसरात दिसून येत आहे. अनेक वेळा बिबट्याला अचानकपणे पाहून येथून रात्रीच्या वेळेस ये-जा करणाऱ्या वाहनचालकांची घाबरगुंडी उडाल्याची चर्चा सुरू आहे. येथील बहुतांश लोक शेतकरी असल्याने त्यांच्याकडे जनावरे मोठ्या प्रमाणात आहेत.
तसेच बऱ्याच शेतकऱ्यांचा शेळ्या मेंढ्याचा व्यवसाय असल्याने चारण्यासाठी नेताना भीती व्यक्त करण्यात येत आहे. जितापूर वीज उपकेंद्रालगत अधूनमधून रात्रीच्या वेळेस बिबट्याच्या मुक्त संचारामुळे येथील नागरिकांना रात्रीच्या वेळी फिरणे तसेच रस्त्यावरून प्रवास करणेही धोकादायक बनले आहे. उमरा परिसरात जितापूर, शहापूर शेतशिवारात गहू, हरभरा, कांदा पिके आहेत.
शेतकरी वन्यप्राण्याच्या बंदोबस्तासाठी रात्रीच्या वेळी शेतात जातात. परंतु या परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी व परिसरातील नागरिक भीती व्यक्त करीत आहेत . गेल्या महिन्यात बिबट्याने जितापूर गावातील लागोपाठ २ गुरांची शिकार केली होती. या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकरी व नागरिकांकडून करण्यात येत आहे.