

अकोला; पुढारी वृत्तसेवा : अकोल्याचे भाजप खासदार अनुप धोत्रे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोटीस बजावली आहे. कोर्टाच्या या नोटीसीमुळे थेट त्यांच्या खासदारकीलाच मोठे आव्हान देण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते गोपाल चव्हाण यांनी अनुप धोत्रे यांच्या लोकसभेवरील निवडीला आव्हान दिले आहे.
या नोटीसला 2 जानेवारीपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. खासदार अनुप धोत्रे यांनी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भ्रष्ट व्यवहार केला असल्याचा आरोप करत त्यांची निवड रद्द करण्यात यावी, अशी याचिका दाखल करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात खर्चाची मर्यादा 95 लाख इतकी होती. मात्र, अनुप धोत्रे यांनी 1 कोटी 24 लाख 60 हजार 590 रुपयांच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या असल्याचा आरोप गोपाल चव्हाण यांनी केला आहे. इतकेच नव्हे, तर धोत्रे यांनी हा खर्च लपवून ठेवला असल्याचा देखील आरोप चव्हाण यांनी केला आहे.