

अकोला : मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजना २.० अंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरू लागले आहे. अकोला जिल्ह्यातील ६३ सौर प्रकल्पांमधून एकूण २०५ मेगावॅट वीज निर्मिती होणार असून, येत्या तिमाहीत हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या कामांना गती देण्यासाठी लोकसंवाद आणि पाठपुरावा वाढवण्याचे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिले.
नियोजन भवनात झालेल्या जिल्हास्तरीय टास्क फोर्सच्या आढावा बैठकीत लोकेश चंद्र यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सुरू झालेली ही योजना इतर राज्यांसाठीही मार्गदर्शक ठरली आहे. जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रीत सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे पुढील वर्षभरात १६,००० मेगावॅट वीज शेतीसाठी दिवसा उपलब्ध होणार आहे. अकोला जिल्ह्यातील ६३ उपकेंद्रांच्या क्षेत्रात २०५ मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प उभारण्यात येत आहेत.
सध्या जिल्ह्यात १२ ठिकाणी ५५ मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. या प्रकल्पांमुळे १९,००० शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे. उर्वरित प्रकल्पांचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी टास्क फोर्सने पुढाकार घ्यावा, तसेच लोकसंवाद व प्रबोधन वाढवावे, असेही निर्देश देण्यात आले. सौर प्रकल्पांसाठी आवश्यक शासकीय व खाजगी जमीन मिळवणे, भूसंपादन आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर भर देण्यात येणार आहे. स्वातंत्र्यदिनी ग्रामसभांमध्ये या योजनांची माहिती देण्याचेही आदेश देण्यात आले.
अकोला जिल्हा सौर प्रकल्पांसाठी शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात राज्यात आघाडीवर आहे. जिल्ह्यातील ८५० शासकीय इमारतींवर सौरायझेशनसाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच, २८ गावांना सौर-ग्राम म्हणून विकसित करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी सांगितले की, सौर प्रकल्पांमुळे शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने आणि वेगाने कार्यवाही करावी.