

अकोला, पुढारी वृत्तसेवा : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथील तलाठी शिलानंद माणिकराव तेलगोटे (वय 39) यांनी तेल्हारा येथील एमआयडीसी परिसरातील झाडाला गळफास घेऊन जीवन संपविले. ही घटना रविवारी (दि. 30) दुपारी समोर आली. तेल्हारा पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे .तलाठी यांच्या मृत्यूनंतर त्यांनी ठेवलेल्या स्टेट्सची चर्चा होऊ लागली आहे. (Akola News)
प्राप्त माहिती नुसार, तेल्हारा तहसील अंतर्गत कार्यरत तलाठी शिलानंद तेलगोटे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली .या घटनेची तक्रार शेषराव चिंतामण बोदळे यांनी तेल्हारा पोलीस स्टेशन ला दिली होती . घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला होता. या प्रकरणी तक्रारीवरून प्रकरणी तेल्हारा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांचा या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. तपासातून तलाठी यांच्या मृत्यू मागील सत्य उघड होण्याची शक्यता आहे. मृत तलाठी शिलानंद माणिकराव तेलगोटे हे तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बाजार, हिवरखेड येथे कार्यरत होते, अशी माहिती आहे.
या घटनेनंतर तलाठी यांनी आपल्या मोबाईलवर ठेवलेल्या स्टेट्सची चर्चा होऊ लागली आहे. पत्नीच्या त्रासापायी जीवन संपवित असल्याचा उल्लेख असून मृत्यूनंतर माझा चेहरा पत्नीला दाखवू नये, असा या स्टेट्स मध्ये उल्लेख आहे. याचीच चर्चा होऊ लागली आहे. मात्र, पुढील चौकशी व तपासातून या घटनेमागील नेमके कारण समोर येईल.