

अकोला, पुढारी वृत्तसेवा : कौटुंबिक न्यायालयात आयोजित लोकअदालतीद्वारे १६ प्रकरणांत जोडप्यांनी मतभेद दूर करून पुन्हा एकत्र नांदण्याचा निर्णय घेतला. अकोला येथे कौटुंबिक न्यायालयात न्यायाधीश श्रीमती आय. जे. नंदा यांच्या मार्गदर्शनात लोकअदालत झाली. त्यात ४० प्रकरणे ठेवण्यात आली. त्यात १६ प्रकरणांतील जोडप्यांनी नात्यातील कटुता परस्पर सामंजस्य व संवादाने मिटवत पुन्हा मुलांसह एकत्रित राहण्याचा गोड निर्णय घेतला. (Akola News)
घटस्फोट न घेता नात्याला नव्याने संधी देऊन नात्यात गोडवा आणण्याचा निर्धार या जोडप्यांनी केला. त्यांच्या निर्णयामुळे चिमुकल्या मुलांच्या चेह-यावरही छान हसू फुलले. याप्रसंगी न्यायाधीशांनी या जोडप्यांना रोपटे देऊन सन्मानित केले. (Akola News)
कौटुंबिक न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणांत पक्षकारांनी लोकन्यायालयात सहभागी होऊन प्रकरण सामंजस्याने सोडवावे, असे आवाहन न्या. श्रीमती नंदा यांनी केले आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष प्र. जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. डी. क्षीरसागर, सचिव वाय. एस. पैठणकर, न्यायाधीश श्रीमती आय. जे. नंदा, जिल्हा अधिवक्ता संघाच्या उपाध्यक्ष श्रीमती कपिले यांच्या मार्गदर्शनात लोकअदालत यशस्वी झाली. पॅनलप्रमुख म्हणून दिवाणी न्यायाधीश श्रीमती ए. ए. देसाई यांनी, तसेच पॅनल सदस्य म्हणून अधिवक्ता किरण जायभाये यांनी काम पाहिले. श्रीमती एस. एन. गांजरे यांनी पक्षकारांचे समुपदेशन केले.