

अकोला : किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून मुलाने वडिलांना लोखंडी पाइपने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी (दि.७) दुपारी सहकारी बँक कॉलनी येथे घडली. याप्रकरणी मूर्तिजापूर शहर पोलिस ठाण्यात मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल देवानंद सोळंके असे मुलाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, देवानंद हरिभाऊ सोळंके हे मूर्तिजापूर येथील सहकारी बँक कॉलनीमध्ये आपल्या कुटुंबियांसोबत राहतात. शनिवारी त्यांचा मुलगा राहूल याने आपल्या बहिणीला फोन उचलला नाही, म्हणून शिवीगाळ केली. त्यावेळी ती तुझी बहीण आहे, तिला शिव्या देवू नकोस असे देवानंद सोळंके त्याला म्हणाले. यावेळी संतापलेल्या निर्दयी मुलाने त्यांना मारहाण केली. त्यानंतर देवानंद सोळंके हे वेल्डिंगच्या दुकानात गेले असता निर्दयी मुलाने तिथेही जाऊन त्यांना लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली. याप्रकरणी राहुल सोळंके याच्याविरूद्ध मूर्तिजापूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.