

अकोला : थकीत मालमत्ता करधारकांविरोधात अकोट नगर परिषदेने मोहीम राबविणे सुरू केले आहे. २१ मार्च रोजी शहरातील सात मालमत्ता सील करण्याची कार्यवाही या अंतर्गत करण्यात आली आहे.
प्राप्त माहिती नुसार, अकोट नगर परिषदेची शहरातील ज्या मालमत्ता धारकांकडे थकीत कर आहे अशाकडून मालमत्ता कर वसुलीसंदर्भात शासनाने घालून दिलेल्या निर्देशानुसार वसुलीचे १०० टक्केचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्थापन केलेल्या विशेष वसूली पथकामार्फत थकबाकीधारकांच्या मालमत्ता सील करण्याची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत २१ मार्चला सात मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत. मालमत्ता सील करण्याची अप्रिय कार्यवाही टाळण्यासाठी नागरिकांनी कराचा भरणा करावा, असे आवाहन नगरपालिकेकडून करण्यात येत आहे.