अकोला - जिल्ह्यातील घूसर गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत दोघांवर चाकू हल्ला झाल्याची घटना १६ सप्टेंबर रोजी घडली. घूसर गावातील सात ते आठ गणेश मंडळांना रीतसर परवानगी देण्यात आली होती. शांततेत विसर्जन मिरवणूक होत असताना राम मंदिर चौकाजवळ अचानक तीन-चार युवकांनी विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत चेतन संतोष रहाणे व विठ्ठल प्रदीप पागृत या दोघांना चाकू हल्ला करत गंभीर जखमी केले. यामुळे मिरवणुकीला गालबोट लागले.
या घटनेची माहिती होताच अकोट फैल पोलिस स्टेशनचे पोलिस घटनास्थळी पोहोचले. जखमी युवकांना तातडीने अकोला येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले. गावातील गणेश मंडळांनी जोपर्यंत आरोपींना पकडत नाही, तोपर्यंत गणेश विसर्जन मिरवणूक पुढे नेणार नसल्याचा पवित्रा घेतला होता. यामुळे सात-आठ तास गावात तणावाचे वातावरण होते. अखेर ठाणेदार रात्री ८ वाजता गणेश विसर्जन करण्यात आले . घटनेचा पुढील तपास अकोट फैल पोलिस करीत आहेत.