

Akot Ajit Pawar Rally
अकोला : नगरपालिकांमध्ये चांगले बदल घडवावे लागतील .काही लोक सांगतात की माजी नगराध्यक्ष आणि माजी नगरसेवकांनी गुत्तेदारी केली. मात्र, ज्याला ठेकेदारी करायची त्याने राजकारण करू नये आणि ज्याला राजकारण करायचे त्याने ठेकेदारी करू नये, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
अकोट येथे नगरपालिका निवडणूक प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. ठेकेदार राजकारणात आल्यास अधिकाऱ्यांना अडचण होते, कंत्राटदार तोच, बिल मंजूर करणारा तोच अशी स्थिती होते की नाही? असा प्रतिप्रश्न त्यांनी जाहीर सभेला संबोधित करताना उपस्थितांना केला.
पवार पुढे म्हणाले की, शहरांचा शाश्वत आणि सर्वांगीण विकास झाला पाहिजे. सर्व घटकांना न्याय दिला गेला पाहिजे. मला कुणाला कमी लेखायचे नाही. मात्र, अकोट शहर धुळीचे झाले आहे. रस्त्यांची अवस्था बिकट आहे, स्वच्छतेचा अभाव आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. हे चित्र बदलायला हवे. धार्मिक वारसा लाभलेल्या अकोट शहराला सक्षम नेतृत्वाची गरज आहे. शहरांचा कायापालट करण्याची इच्छाशक्ती या भागातील मतदारांनी दाखवली पाहिजे.
नगर पालिकेत चांगले बदल घडवायचे असतील तर चांगले लोकं तिथे हवेत. चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी लोक असतात. आम्ही बारामतीचा विकास कसा केला. जरा तिकडे जाऊन पहा उगीच लोकं मला लाखाच्या वर मते देऊन निवडून देत नाहीत, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले.
अकोट, तेल्हारा, मूर्तिजापूर आणि हिवरखेड येथील नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाकरिता निवडणूक लढावीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन पवार यांनी केले.
हिवरखेड नगरपरिषद चा मुद्दा आ अमोल मिटकरी यांनी लावून धरला होता. प्राजक्त तानपुरे नगरविकास मंत्री असताना हिवरखेड नगर पालिका करायची असे त्यांना सांगितले होते, असेही पवार यावेळी म्हणाले.