

अकोला : आज दुपारी 2:30 वाजताच्या दरम्यान अकोट तालुक्यातील बोर्डी परिसरात वादळी वारा ,गारपीट सह जोरदार पाऊस बरसला. बोर्डी , शिवापूर, रामापुर येथील अनेक घरावरील टिनपत्रे उडून गेली तसेच वृक्ष उन्मळून पडल्याने अकोट ते बोर्डी रस्ता सध्या बंद असल्याची प्राथमिक माहिती आहे. अकोला शहरात दुपारी 3.30 वाजताच्या दरम्यान वाऱ्यासह पाउस सुरू झाला आहे.
आज गुरुवारी दुपारी अचानक अकोट तालुक्यातील बोर्डी ,शिवापूर , धारूररामापुर या परिसरात वादळी वाऱ्यासह पाउस बरसला. या वेळी बोर्डी गावात काही वेळ गारपीट देखील झाली. एका वृक्षावर वीज कोसळल्याने या वृक्षाखालील दोघे जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. बोर्डी सह परिसरातील तीन गावांना या वादळी वारा व पावसाचा फटका बसला आहे. बोर्डी गावातील वीज तारा तुटून खाली पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. बोर्डी ते अकोट मार्गावर वृक्ष उन्मळून पडल्याने हा रस्ता सध्या बंद आहे. अकोला शहरात विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह पाउस सुरू आहे. बोर्डी परिसरातील संत्रा, लिंबू आदी फळपीकांना या पावसामुळे फटका बसल्याचे सांगण्यात येते.