
Ajit Pawar Latest Speech On Ladki Bahin Yojana
अकोला : 'मी कडक स्वभावाचा माणूस असल्याने मला काही गोष्टी खपत नाही’ असं स्पष्ट करत ‘आपली बदनामी होईल अशांना प्रवेश दिला जाणार नाही, पक्षप्रवेश देताना लोकांची पार्श्वभूमी तपासा’ अशा शब्दात अजित पवारांनी कार्यकर्त्यांना ‘दादास्टाईल’ने तंबी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंगळवारी अकोला जिल्ह्यात होते. विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश सोहळा याप्रसंगी पार पडला. भाषणात अजित पवारांनी खास त्यांच्या शैलीत कानपिचक्याही दिल्या. ‘कार्यकर्ते मला भेटायला येतात. मोठे हार घेऊन येतात. ५००० हजार रुपयांचा हार घातला की आपलं काम होईल असं त्यांना वाटतं. हार पाच हजारांचा आणि काम सांगतात पाच कोटींचं’, असे अजित पवारांनी सांगताच हशा पिकला.
‘माझ्याकडून पुण्यात चूक झाली होती. मी एका गुंड प्रवृत्तीचा व्यक्तीला प्रवेश दिला होता. पण ही चूक लक्षात येताच त्या व्यक्तीला पक्षातून काढून टाकलं. नुकतंच नांदेडमध्येही पक्षात प्रवेश करणारी व्यक्ती योग्य नव्हती अशी बातमी वृत्तपत्रात छापून आली होती. त्यालाही प्रवेश नाकारण्यात आला. पक्षात लोक कमी असली तरी चालेल पण जी असतील ती जीवाभावाची लोक हवी. गुंडप्रवृत्तीच्या लोकांना पक्षात प्रवेश दिला जाणार नाही. पक्षप्रवेश देताना त्यांची पार्श्वभूमी, रेकॉर्ड तपासा’, असे अजित पवारांनी सांगितले.
काही लोकांच्या ओठावर एक आणि पोटात एक
'संघटना चालवताना बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. जबाबदारी देऊन विश्वास ठेवावा लागतो. आपण सगळे एकाच विचारधारेचे लोक आहोत. तुमची आणि आमची विचार धारा वेगळी असं नसते. सर्वधर्म समभाव हीच आपली विचारधारा आणि शिकवण आहे. काहींच्या पोटात एक आणि ओठावर एक असा असतं. आपला राष्ट्रवादी काँग्रेस तसा नाही', असंही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले. मात्र, त्यांचा रोख नेमका कुणाकडे याची चर्चा आता सुरू झालीये.
लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार
आजच पावणेचार हजार कोटींच्या फाईलवर मी स्वाक्षरी केलीये. आता लाडके बहीण योजनेचे मे महिन्याचे पैसेही लवकरच मिळतील, अशी घोषणाही त्यांनी केली.
..तेव्हा निर्णय घेता येत नव्हते
जेव्हा राष्ट्रवादी पक्ष निर्माण झाला तेव्हा आम्ही तरुण होतो, त्यावेळी पक्षाचे निर्णय घेता येत नव्हते. पण आता त्याला 25 वर्ष झालीत. पूलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय, असं सांगत अजित पवारांनी शरद पवारांवरही निशाणा साधला.