

अकोल्यातील डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीचे कुटुंबीय गणेश विसर्जनासाठी बाहेर गेले असताना हा प्रकार घडला.
शनिवारी (दि. ७ सप्टेंबर २०२५) रोजी जुने शहर परिसरातील तौहीद समीर बैद (वय २४) या युवकाने घरात घुसून पीडितेला चाकूचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी डाबकी रोड पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
या घटनेनंतर परिसरातील संतप्त नागरिकांनी अकोल्यातील सर्किट हाऊस येथे आमदार रणधीर सावरकर यांची भेट घेतली. आमदार सावरकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना तातडीने फोन करून कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहनही यावेळी केले.
अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांनी देखील या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
“गुन्हेगाराची जात, धर्म, पक्ष काही नसतो – तो फक्त आरोपी असतो.” असे स्पष्ट करत त्यांनी पोलीस प्रशासनाने कोणताही दबाव न घेता तातडीने कारवाई करावी, असे आवाहन केले.
त्यांनी पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे.
त्यांनी मागणी केली की, तौहीद बैद या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी.
दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे. या प्रकरणामुळे अकोल्यात मोठी खळबळ उडाली असून, लोकांमध्ये संतापाची भावना आहे. पोलिसांनी जनतेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.