..तर निवडणुकांचे पर्व संपून जाईल : नाना पटोले | पुढारी

..तर निवडणुकांचे पर्व संपून जाईल : नाना पटोले

अकोला; पुढारी वृत्तसेवा : राज्यात फुले शाहू, आंबेडकर विचारांवर धर्मांध शक्ती वरचढ होत आहे. भाजप विभाजनाची खेळी खेळून जाती-धर्माकडे सामान्यांना घेऊन जात असल्याचा आरोप करत जर लोकशाही आणि संविधान टिकले नाही तर निवडणुकांचे उत्सव पर्व कायमाचे संपेल, असे प्रतिपादन कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

अकोल्यात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांच्या नामांकन अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने येथील स्वराज भवनाच्या मैदानात आयोजित सभेत पटोले बोलत होते.देशात सामान्य जनतेला गुलामगिरीकडे नेण्याचा प्रयत्न होत आहे. शेतकऱ्यांना जीएसटीचा सामना करावा लागत आहे. आम्ही सत्तेत आलो तर शेतमालास दीडपट भाव देऊन शेतकऱ्यांना जीएसटी मुक्त करू व नोकऱ्या व रोजगारासाठी प्राधान्य करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

भाजपा प्रणीत सरकार नवनवीन वाद निर्माण करून राजकीय पोळी शेकत आहे .कोरोना काळात ताट-वाट्या वाजवून व दिवे लावून नागरिकांची दिशाभूल केल्याचा आरोप करत सरकार महागाई, शेतकरी, रोजगार यांच्याबाबतीत का बोलत नाही, असा सवालही पटोले यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांनी ही निवडणूक विचारांची लढाई आहे. त्यासाठी सज्ज राहून महाविकास आघाडीला साथ देण्याचे आवाहन केले. यावेळी महाविकास आघाडीचे घटक पक्षातील नेते व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button