अकोला : आचारसंहितेच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध आदेश जारी | पुढारी

अकोला : आचारसंहितेच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध आदेश जारी

अकोला : पुढारी वृत्तसेवा – कोणत्याही राजकीय पक्षाने, उमेदवार किंवा प्रतिनिधीने शासकीय, निमशासकीय कार्यालय, विश्रामगृह येथे सभा घेणे, वापर करणे, तेथील आवाराचा रॅली आदींसाठी वापर करणे, अशा आवारात फलक, भित्तीपत्रके आदी बाबींना निर्बंध घालण्यात आले आहेत. शासकीय, निमशासकीय कार्यालय, विश्रामगृहे आदी ठिकाणी मोर्चा, धरणे, उपोषण करण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. धार्मिक स्थळे, रूग्णालये, शैक्षणिक संस्था व मतदान केंद्राच्या २०० मीटर अंतरामध्ये तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक मालमत्तेवर होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स, भिंतीवर जाहिराती आदी लावून त्या मालमत्ता विद्रुप करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

जिल्ह्यात कुठलेही जात, भाषा, धार्मिक शिबिरे व मेळाव्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही पक्षांनी किंवा उमेदवारांनी ताफ्यामध्ये दहापेक्षा अधिक मोटारगाड्या वापरण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.

उमेदवारांनी, त्यांच्या प्रतिनिधींनी, त्यांच्या हितचिंतकाने, मुद्रणालय मालकाने किंवा इतर सर्व माध्यमाद्वारे छपाई करणाऱ्या व्यक्तीने किंवा प्रकाशकाने नमुना मतपत्रिकेत इतर उमेदवारांचे नाव व चिन्ह वापरणे, नमुना मतपत्रिकेसाठी आयोगाने निश्चित केल्यानुसार कागद वापरणे, आयोगाने निश्चित केलेल्या कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिका छापणे आदी सर्व बाबींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानुसार नमुना मतपत्रिका छपाईस निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत.

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज काढले

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक जाहीर होताच शासकीय, सार्वजनिक व वैयक्तिक ठिकाणांवरील फलक, भिंतीवरील मजकूर व इतर मजकूर हटविण्यात आला. निवडणूक जाहीर होताच २४ तासांत शासकीय कार्यालयांवरील १ हजार ९४६ फलक हटविण्यात आले. जिल्ह्यात विविध सार्वजनिक व वैयक्तिक ठिकाणांवरून २ हजार २०० आणि व्यक्तिगत ठिकाणांहून १२९ फलक काढण्यात किंवा मिटविण्यात आले.

Back to top button