HSC Board Exam 2024 : बारावी परीक्षा केंद्रावर तोतया पोलीस बनून बहिणीला कॉपी द्यायला गेला; सॅल्यूट ठोकताच बिंग फुटलं

HSC Board Exam 2024 : बारावी परीक्षा केंद्रावर तोतया पोलीस बनून बहिणीला कॉपी द्यायला गेला; सॅल्यूट ठोकताच बिंग फुटलं

अकोला; पुढारी वृत्तसेवा : अकोला जिल्ह्यातील पातूर येथील बारावीच्या परीक्षा केंद्रावर तोतया पोलीस बनून बहिणीला कॉपी द्यायला गेलेल्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे. परीक्षा केंद्रावर सॅल्यूट करताना पोलीस निरीक्षकांना संशय आल्याने तोतया पोलिसाचं बिंग फुटलं. अनुपम मदन खंडारे (वय २४) रा. पांगराबंदी, असे या नकली पोलिसाचे नाव आहे. (HSC Board Exam 2024)

बारावीच्या परीक्षेला इंग्रजीच्या पेपरने बुधवारी सुरुवात झाली. १९ मार्चपर्यंत ही परीक्षा चालणार असून राज्यातील परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी शिक्षण मंडळाकडून अभियान राबवले जात आहे. परीक्षा कालावधीत कोणत्याही प्रकारच्या अनुचित घटना घडू नये म्हणून परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले होते. कॉपीमुक्त अभियानातून दिलेल्या सूचनांचा काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परीक्षा केंद्रावरील गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र काही कॉपी बहाद्दर कोणती ना कोणती युक्त्यी शोधून कॉपी करतातच. असाच प्रकार इंग्रजी विषयाच्या पेपरला पातुरच्या शाहबाबू उर्दू हायस्कूल येथे घडला. अनुपम खंडारे हा पोलिसांचा गणवेश परिधाण करून बहिणीला कॉपी देण्यासाठी गेला होता. पेपर सुरू असतानाच पातूरचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके आपल्या टीमसह परीक्षा केंद्रावर गेले होते. यावेळी त्यांना अनुपम हा पॉकेटमधून कॉपी देताना दिसून आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाहून अनुपमने सल्यूट ठोकला. परंतू पोलिसांना त्याचा सल्यूट पाहून संशय आला. तसेच त्याचा गणवेश आणि त्यावरील नावाची प्लेट चुकीची असल्याचे दिसले. चौकशीअंती तो तोतया असल्याचे निष्पन्न झाले. (HSC Board Exam 2024)

या प्रकरणी अनुपम खंडारे याच्याविरुद्ध पोलिसांनी भादंविचे कलम ४१७, ४१९, १७१ महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियमन मंडळाच्या इतर परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकार प्रतिबंधक अधिनियमन १९८२ कलम ७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किशोर शेळके करीत आहेत. (HSC Board Exam 2024)

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news