गडचिरोली : सुरजागड यात्रेत लोहखाणीविरुद्धचा संघर्ष तीव्र करण्याचा निर्धार | पुढारी

गडचिरोली : सुरजागड यात्रेत लोहखाणीविरुद्धचा संघर्ष तीव्र करण्याचा निर्धार

गडचिरोली ; पुढारी वृत्‍तसेवा

संविधानाच्या तरतुदी आणि कायद्यांची पायमल्ली करून जिल्ह्यात खाणी खोदून आदिवासींच्या हक्कांवर गदा आणली जात आहे. त्याविरुध्द आवाज उठविणारे नेते, कार्यकर्ते आणि स्थानिक पारंपरिक प्रमुखांना बदनाम करुन खाणविरोधी आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न कंपनी आणि सरकार करीत आहे. मात्र हे कारस्थान हाणून पाडून सुरजागडसह संपूर्ण बेकायदेशीर लोह खाणींच्या विरोधातील जनतेचा संघर्ष आणखी तीव्र करण्याचा निर्धार सुरजागड येथे आयोजित ओअदाल पेन (ठाकूरदेव) यात्रेनिमित्त शेवटच्या दिवशी झालेल्या खाणविरोधी जनसभेत करण्यात आला.

या जनसभेला सुरजागड पारंपरिक इलाख्याचे प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य सैनू गोटा, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. महेश कोपूलवार, जिल्हा सचिव देवराव चवळे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव अमोल मारकवार, शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, जयश्री वेळदा, पत्रकार हेमंत डोर्लीकर, संजय वाकडे, पंचायत समिती सदस्य शीला गोटा, सुरजागडच्या माजी सरपंच कल्पना आलाम, सरपंच करुणा सडमेक, मंगेश होळी, लक्ष्मण नवडी, मंगेश नरोटे, मुंशी दुर्वा, पत्तू पोटावी प्रामुख्याने उपस्थित होते.

दोन दिवस चाललेल्या या यात्रेत सुरजागड पहाडावरील ठाकूरदेवाची पूजा-अर्चा करण्यात आली. त्यानंतर आदिवासींनी पारंपरिक वेशभूषेत सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. शिवाय सभेत आदिवासींना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवरही चर्चा करण्यात आली.

Back to top button