विजय वडेट्टीवार म्हणाले, लॉकडाऊन संदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील | पुढारी

विजय वडेट्टीवार म्हणाले, लॉकडाऊन संदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : पश्चिम बंगालमध्ये मिनी लॉकडाऊन लागला आहे. महाराष्ट्रातही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बाबत गंभीर असून पश्चिम बंगाल सरकारने जो निर्णय घेतला तसाच निर्णय मुख्यमंत्री घेण्याची शक्यता आहे, अशी माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी माध्यमांशी नागपुरात संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. पश्चिम बंगालमध्ये शाळा, सगळं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कदाचित ही स्थिती राज्यातही अशीच राहिली, राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर महाराष्ट्रातही बंगालसारखी स्थिती निर्माण होईल. पश्चिम बंगाल सरकारने जो निर्णय घेतला, तसाच निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुध्दा घेण्याची शक्यता आहे. असे वडेट्टीवार यांनी सांगितले. मुलांचे लसीकरण करणं हे आवश्यक होतं. १५ ते १८ वयोगटातील मुलांचं लसीकरण झालं की त्याच्या खालीही जाता येईल. पालकांनी आपल्या पाल्यांचे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. कोणतीही हयगय करू नये. त्याचा कोणताही साईट परिणाम नाही, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

राज्यात लॉकडाऊन लागू झाल्यावर तो कसा लागू होईल ? याबाबतची माहितीही त्यांनी दिली. काही ठिकाणी कंटेन्मेंट झोन तयार करून प्रवेश बंदी करण्यात येईल. गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. रेल्वे, शाळा बंद करण्याचा निर्णय लॉकडाऊनमध्ये होत असतात. रेल्वेत गर्दी वाढतच आहे. त्यावर मुख्यमंत्री गंभीर आहेत. पण निर्णय कधी घ्यायचा याबाबत कॅबिनेटमध्ये निर्णय होईल. टास्क फोर्सशी चर्चा करून निर्णय होईल. या कॅबिनेटमध्ये चर्चा होईल. निर्णय या कॅबिनेटमध्ये होईलच हे सांगता येणार नाही. पण निर्णय तर घेतला जाईलच, असे ही त्यांनी सांगितले.

राज्यात तिसरी लाट आली आहे की नाही हे आत्ताच सांगणे कठीण असले तरी राज्यातील दैनंदीन रुग्णसंख्या वाढत आहे. कालपर्यंत दहा हजारावर रुग्ण संख्या गेली आहे. या पुढे विद्यार्थी कोरोनाचा टार्गेट असणार आहे. त्यामुळे १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचं लवकरात लवकर लसीकरणासाठी सर्व यंत्रणा सज्ज केल्या आहेत. मागे जशी मोहीम राबवली होती, तशीच मोहीम राबवणार आहोत. जेवढ्या लसी मिळतील त्या सर्व लसींचा शंभर टक्के वापर करून लवकरात लवकर लसीकरण करण्यात आलं आहे. साधारण एका केंद्रावर किती लस लागतात. त्याची चाचपणी झाली आहे. लसीकरणाचा साठा कमी पडणार नाही. नियोजन केलं आहे त्यानुसार साठा कमी पडणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

Back to top button