बुलडाणा : पित्यानेच केली आपल्या १३ वर्षीय मुलाची पाण्यात बुडवून हत्या | पुढारी

बुलडाणा : पित्यानेच केली आपल्या १३ वर्षीय मुलाची पाण्यात बुडवून हत्या

बुलडाणा, पुढारी वृत्तसेवा

आपल्या १३ वर्षीय मुलाला झोपेतून ऊठवून नेत निर्दयी पित्याने घराजवळील नदीपात्रात त्याचा गळा दाबून, पाण्यात बुडवत त्याचा खून केला. ही धक्‍कादायक घटना  सवडद ( ता. सिंदखेडराजा ) येथे आज पहाटे उघडकीस आली. साखरखेर्डा पोलीसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे.

या घटनेबाबत मिळालेलली अधिक माहिती अशी की, सवडद गावातील माळीपु-यात राहणारा सिद्धेश्वर सखाराम नन्हई (वय ४०) हे मुलगा अमर (वय १३), मुलगी जान्हवी(वय ५) व पत्नी रत्नमाला (वय ३५) यांच्यासोबत राहतात. त्यांच्या कुटूंबातील सर्व सदस्य झोपलेले असताना पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सिद्धेश्वर याने शौचास जाण्यासाठी माझ्यासोबत चल असे सांगून, मुलगा अमर याला झोपेतून उठवत नेले. त्यानंतर त्यांनी अमर याला घराजवळील कोराडी नदी पात्राकडे त्याला नेले. त्या ठिकाणी अमरचा गळा दाबून नदीतील पाण्यात तोंड दाबून त्याची हत्या केली.

आरोपी पित्याने आपण मुलगा अमर याला मारून टाकल्याचे गावात सांगण्यास सुरवात केली. त्यानंतर गावक-यांनी माथेफिरु सिद्धेश्वर याला पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले. पोलीसांच्या तपासात त्याने नदीपात्रातील नाल्यातून मुलगा अमर याचा मृतदेह काढून दिला. या भीषण घटनेने सवडद गाव हादरले. अमर हा जि.प.शाळेत सातवीच्या वर्गात शिकत होता. सिद्धेश्वर हा मद्यपी असून पत्नी व मुलांचा नेहमी छळ करत होता, अशी माहिती समोर आली. याप्रकरणी  साखरखेर्डा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तपास पोलीस कर्मचारी जितेंद्र आडोळे, सचिन कानडे करीत आहेत.

हेही वाचलं का? 

Back to top button