चंद्रपूर आत्महत्या : नापिकी आणि कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

चंद्रपूर आत्महत्या : नापिकी आणि कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा

सततच्या किडींमुळे होणारी नापिकी आणि कर्जाला कंटाळून ब्रह्मपुरी तालुक्यातील खरकाडा येथील एका पन्नास वर्षीय शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज गुरूवारी ( 9 डिसेंबर 2021) ला पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. किसन मारुती दहीकार असे मृत शेतक-याचे नाव आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील खरकाडा येथील किसन दहिकर हे त्यांच्यावर असलेले कर्ज आणि सततच्या नापिकीमुळे चिंताग्रस्त होते. त्यामुळे त्यांची मानसिकता खचली होती. काल दुपारच्या सुमारास किसन दहिकर स्वत:च्या सायकलने बाहेर गेले होते. सायंकाळी घरी परत न आल्याने कुटूबियांनी त्याची आजूबाजूला गावात शोधाशोध केली. मात्र ते आढळून आले नाही.

आज गुरुवारी 9 डिसेंबरला पहाटेच्या सुमारास किसन मारुती दहीकार यांचा मृतदेह स्वतःच्या शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास लागलेल्या अवस्थेत आढळून आला. काही नागरिक या परिसरात गेले असता त्याच्या ही घटना निदर्शनास आली. त्यांनी लगेच याबाबत त्यांच्या कुटुंबीयांना व पोलिसांना माहिती दिली.

त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येवून मृतदेह ताब्यात घेतला व पंचनामा केला. सदर शेतक-याच्या खिशात सोसायटीच्या कर्जाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे चिट्ठीत लिहून ठेवले आहे. त्यांच्यावर सेवा सहकारी संस्थेमार्फत चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा चौगानचे 34 हजार रुपयांचे कर्ज आहे. तसेच बचत गटाचेही कर्ज असल्याची माहिती आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी,दोन मुले व एक मुलगी असा आप्त परिवार आहे. पुढील तपास ब्रम्हपुरी पोलिस करीत आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news