नागपूर : हप्ता वसुली करणारे मंत्र्यांचे नातेवाईक कोण? वडेट्टीवार संतापले

विजय वडेट्टीवार
विजय वडेट्टीवार

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : हिंगणा एमआयडीतीसील स्फोटातील मृतकांची संख्या 7 झाली असताना विरोधकांनी सरकारला घेरले आहे. शुक्रवारी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आदी अनेक नेत्यांनी घटनास्थळाला भेट दिली.

स्फोटातील मृतकांच्या कुटुंबीयांना आणि जखमींना मदत करण्याची मागणी केली. यावेळी वडेट्टीवार यांनी संबंधित खात्याच्या मंत्र्यांचे नातेवाईक दर तीन महिन्यांनी नागपूरला येतात आणि स्फोटके तयार करणाऱ्या कंपन्यांकडून वसुली करतात असा खळबळजनक आरोप केल्याने राजकारण तापले आहे.

नागपूर-अमरावती मार्गावरच्या धामना गावात चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीत फटाक्यांची निर्मिती केली जाते. गुरुवारी दुपारी या कंपनीत मोठा स्फोट झाला. यात होरपळून पाच महिलाचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी आहेत.

स्फोट झाल्याचे समजताच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सर्वप्रथम घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश दिले. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी स्वागत समारंभ तसेच सत्काराचे सर्व कार्यक्रम रद्द केले. त्यांनी आज सकाळीच घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

यावेळी वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका घेतली. स्फोटाला थेट राज्य सरकारला जबाबदार धरले. ते म्हणाले, स्फोटके तयार करणाऱ्या कंपन्यांची दर तीन महिन्यांनी पाहणी खरे पाहता बंधनकारक आहे. यापूर्वी सुद्धा याच परिसरातील एका कंपनीत भीषण स्फोट झाला. मात्र मदत जाहीर करून सरकार दरवेळी आपली सुटका करून घेते. मुळात असे गंभीर स्फोट होऊच नयेत. सुरक्षेसंदर्भात काहीच उपाय योजना केल्या जात नाही. खबरदारी घेतली जात नाही.

धोकादायक कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. कागदोपत्री खानापूर्ती करून कंपन्यांना प्रमाणपत्र दिले जाते. कोणाचेही नाव न घेता यावेळी वडेट्टीवार यांनी यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या खात्याचे मंत्री असलेल्यांचे नातेवाईक मात्र नियमितपणे कंपन्यांना भेट देतात आणि हप्ता वसुली करतात असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news