

नागपूर, पुढारी वृत्तसेवा
येथील सहा वर्षीय राघव भांगडे याने चक्रासन या योग क्रीडा प्रकारात नवा विक्रम स्वत:च्या नावे केला. तो १.१३ मिनिटात १०२ पायऱ्या उतरला. यावेळी राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार, आमदार विकास ठाकरे, नगर सेवक परिणता फुके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विदर्भ कराटे असोसिएशनतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. येथील एका इमारतीच्या पायऱ्यांवर राघव चक्रासन स्थितीत उतरला. यावेळी क्रीडामंत्री सुनील केदार यांनी, राघवला राज्य सरकारतर्फे सर्वतोपरी मदत केली जाईल, असे सांगितले. (Raghav Bhangade's record)
राघव अडीच वर्षापासून विविध क्रीडा प्रकाराचा सराव करीत आहे. वयाच्या पाचव्या वर्षी त्याने एक मिनिटात १२५ टाईल्स फोडण्याचा विक्रम केला. विदर्भ कराटे असोसिएशनचे विजय गिजारे यांच्याकडून तो कराटेचे प्रशिक्षण घेत आहे. २०२० मध्ये राघव १ मिनिटे ५२ सेकंटात १०२ पायऱ्या चक्रासनात चढला होता. (Raghav Bhangade's record)
आज केलेल्या या नव्या विक्रमामुळे वर्ल्ड वाईल्ड बुक ऑफ रेकार्डमध्ये त्याची नोंद झाली आहे. याप्रसंगी विद्यापीठ क्रीडा अकादमीचे संचालक सुधीर सूर्यवंशी, तालुका क्रीडा अधिकारी पवन मेश्राम हे परीक्षक म्हणून उपस्थित होते. राघवचे आई, वडील साहिल व तृप्ती भांगडे वकील आहेत. त्याला विद्यापीठ क्रीडा अकादमीचे माजी संचालक धनंजय वेलुरकर याचे मार्गदर्शन लाभत आहे.