नागपूर : महावितरणकडून स्मार्ट मीटर बसवण्यास सुरूवात

नागपूर : महावितरणकडून स्मार्ट मीटर बसवण्यास सुरूवात
Published on
Updated on

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : शहरात स्मार्ट मीटरला राजकीय पक्ष,विविध संघटनाकडून विरोध होत होता. परंतु, वीज ग्राहकांना बिलाबाबत पारदर्शी आणि अत्यंत अचूक सेवा मिळण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या स्मार्ट मीटर बसविण्याची सुरुवात महावितरणने स्वतःपासून केली आहे. महावितरणने 18 कार्यालये आणि कर्मचारी निवासमधील 323 सदनिका अशा 341 वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसवले आहेत. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसविताना महावितरणने स्वतःपासून सुरुवात करून उदाहरण घालून द्या. असे सांगितले.

नागपूर शहरात 60, गोंदियामध्ये 146, वर्धा येथे 30, भंडारा येथे 10 आणि चंद्रपूरमध्ये 95 अशा एकूण 341 वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. यामध्ये महावितरणची कार्यालये आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचा समावेश आहे. केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या आधारे राज्यात कृषी ग्राहक वगळता सर्व ग्राहकांच्या कार्यालय अथवा निवासस्थानी विजेचे स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत. त्यासाठीचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून आता प्रत्यक्ष मीटर बसविण्यात येत आहेत. वीज ग्राहकांना महावितरणकडून स्मार्ट मीटर मोफत मिळणार आहेत. संबंधित कंपन्यांवर या मीटरची दहा वर्षे देखभाल दुरुस्ती करण्याचे बंधन आहे.

महावितरणच्या वीज ग्राहकांना देण्यात येणारे स्मार्ट मीटर हे आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित आहेत. त्यामुळे वापरलेल्या विजेची अचूक नोंद होईल तसेच वीज ग्राहकांना त्यांच्या मोबाईल फोनवर नियमितपणे आपला वीजवापर समजेल. सध्या सर्वत्र वापरात असलेल्या पारंपरिक मीटरच्या बाबतीत चुकीचे रिडिंग होणे, वेळेवर रिडिंग झालेले नसणे, चुकीची बिले येणे, अशा समस्या जाणवतात. मोठा वीजवापर झाल्यानंतर बिल मिळाले की अचानक ग्राहकाला आपल्या वीजवापराबद्दल समजते आणि धक्का बसतो. अत्यंत पारदर्शी पद्धतीने अचूक बिलिंग हे स्मार्ट मीटरचे वैशिष्ट्य आहे. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांच्या बिलाविषयीच्या तक्रारींचे संपूर्ण निराकरण होईल. देशामध्ये मध्य प्रदेश, बिहार, जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश इत्यादी राज्यात स्मार्ट मीटरचा वापर काही प्रमाणात सुरू झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news