हिट अँड रन : महिला-बाळाची प्रकृती गंभीर, तिघांना पोलीस कोठडी | पुढारी

हिट अँड रन : महिला-बाळाची प्रकृती गंभीर, तिघांना पोलीस कोठडी

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर-पुणे पाठोपाठ नागपूरातही सलग दुसऱ्यांदा मद्यधुंद चालकाकडून ‘हिट अँड रन’ची घटना घडली. महाल झेंडा चौकात घडलेल्या अपघातात महिला कारखाली आल्याने तिला पाय आणि कंबरेला गंभीर तर तिच्या दीड महिन्यांच्या बाळाची तब्येत डोक्याला मार बसल्याने नाजूक असल्याची माहिती जखमी महिलेच्या पतीने दिली आहे. या प्रकरणी तहसील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ते तिघेही आरोपी दारूच्या नशेत होते हे देखील निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात तहसील पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली आहे.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांमध्ये चालक सनी चव्हाण, अंशुल ढाले आणि आकाश निमोरिया यांचा समावेश आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सनी चव्हाण, अंशुल ढाले हे दोघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. त्यांच्यावर इमामवाड्यासह शहरातील काही पोलीस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. नाझमिन शेख वसीम शेख असे गंभीर जखमी महिलेचे नाव आहे तर जोहान वसीम शेख असे या चिमुकल्याचे नाव आहे. तिसऱ्या जखमीचे नाव सचिन सूर्यभान सुभेदार आहे. तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आई आणि बाळाची तब्येत चिंताजनक आहे.

शुक्रवारी रात्री झालेल्या या अपघातातील आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी विषयी पोलीस उपायुक्त गोरख भामरे यांनी आज (दि.25) माध्यमांशी बोलताना माहिती दिली. कारचालक आणि त्याच्यासोबत गाडीत बसलेले त्याचे दोन सहकारी मद्यधुंद अवस्थेत होते. गाडीत दारूच्या बाटल्या आणि गांजाची पुडी सापडली आहे. बाळाचे आई-वडील बाळाला वॅक्सिनसाठी (लस) देण्यासाठी रुग्णालयामध्ये जात होते. मात्र, वाटेतच हा अपघात झाला.

काल (दि.24) रात्री ही घटना घडल्यानंतर संतप्त लोकांनी कारची तोडफोड करीत चालकाला बेदम मारहाण केली. तर दोघे पसार झाले त्यांना नंतर पोलिसांनी पकडून आणले. न्यायालयाने आज आरोपींना पोलीस कोठडी सुनावली असून कारमध्ये सापडलेला गांजा कुठून आणला, ते कुणाला देण्यासाठी जात होते का? याचा आता तपास केला जाणार असून यासोबतच ही कार कुणाची याचा शोध घेतला जात असून आरोपीची संख्या वाढणार असल्याचे भामरे यांनी स्पष्ट केले.

Back to top button