गोंदिया, पुढारी वृत्तसेवा
पुन्हा एकदा गोंदिया शहरातील गुन्हेगारी उफाळून बाहेर आली आहे. सोमवारी (ता.२२) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास शहरातील रेती व्यवसायिक गोलू तिवारी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर रेती व्ययसायिकांमध्ये दहशत निर्माण झाली असतानाच या प्रकरणी पोलिसांनी सहा ते सात संशयितांना ताब्यात घेतले आहे.
मिनी मुंबई म्हणून ओळख असलेल्या गोंदिया शहरात गँगवॉरचा आलेख वाढीवर आहे. त्यात आता गोंदिया शहर झपाट्याने व्यावसायिक गुन्हेगारांचे अड्डे बनत आहे. शहरातील रिंगरोड परिसरातील हनुमान नगर येथील रहिवासी रेती व्यवसायिक गोलु तिवारी यांच्यावर सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास टीबीटोली परिसरात काही गुंडांनी गोळीबार केला. दरम्यान, त्यांना शहरातील सहयोग हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गोलू तिवारी यांच्या समर्थकांनी सहयोग रुग्णालयासमोर गर्दी केली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर तिवारी यांच्या समर्थकांकडून हॉस्पिटल मध्ये तोडफोडही करण्यात आल्याची माहितीही समोर आली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिस्थिती हाताळली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी फॉरेन्सिक पथक, श्वानपथक, सीसीटीव्ही यासह सर्व प्रकारचे पुरावे गोळा करून मारेकऱ्यांना पकडण्याचे निर्देश दिले. दरम्यान, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, रामनगरचे पोलीस निरिक्षक संदेश केंजळे व रावणवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक यांनी तपास पथके तयार करून तपासाची चक्रे गतीशील केली. दरम्यान, पोलिसांनी या प्ररकरणात अंदाजे सहा ते सात जणांना ताब्यात घेत विचारपूस सुरू केली असून यात आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.