भंडारा: पवनारा येथे भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोघे ठार | पुढारी

भंडारा: पवनारा येथे भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोघे ठार

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : भरधाव ट्रकने दुचाकीला समोरासमोर धडक दिल्याने दुचाकीवरील दोघांचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना तुमसर-गोबरवाही मार्गावरील पवनारा नाल्याजवळ घडली. विजय धुर्वे (वय २६, रा. चिखला) आणि तुफान उईके ( वय ४५, रा. टेकाडी) अशी मृतांची नावे आहेत. तर  शैलेश वट्टी (वय ४०, रा. चिखला) असे जखमीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय धुर्वे, तुफान उईके आणि शैलेश वट्टी हे दुचाकी (एमपी ५० सीएस ६१३४) ने नागपूर ते जयपूर खापा करीता पवनारा ते चिचोली मार्गाने जात होते. दरम्यान, पवनारा नाल्याजवळ गोबरवाहीकडून तुमसरकडे जाणारा ट्रक (सीजी ०८ एएक्स ८१२२) ने भरधाव वेगात येत रस्त्याच्या विरुद्ध दिशेने जात दुचाकीला समोरासमोर धडक दिली. या अपघातात तिन्ही युवकांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर गंभीर जखमी युवकांना रुग्णालयात घेऊन जात असताना विजय धुर्वे आणि तुफान उईके यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी तुमसर पोलिस ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक कोल्हे करीत आहेत.

हेही वाचा 

Back to top button