यवतमाळ : एकाच दिवशी रोखले पाच मुलींचे बालविवाह | पुढारी

यवतमाळ : एकाच दिवशी रोखले पाच मुलींचे बालविवाह

यवतमाळ, पुढारी वृत्तसेवा : सोमवारी एकाच दिवशी पाच मुलींचे बालविवाह राेखण्यात जिल्हा बाल संरक्षण कक्षाला यश आले. बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षाला मिळाली. पिंपळशेंडा ता. पांढरकवडा येथे आठ बाल विवाह नियोजित आहे असे सांगण्यात आले. याच माहितीच्या आधारावर तातडीने नववधूच्या वयाची शहानिशा केली असता ५ बालिका या अल्पवयीन असल्याचे पुढे आले. या पाच बालिकांचे विवाहन राेखण्यात आले.

ही कारवाई जिल्हा महिला बाल विकास अधिकारी प्रभाकर उपरे मार्गदर्शनात करण्यात आली. कुटुंबातील पालकांना मुलींचा विवाह वयाची १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी न करण्याबाबत समुपदेशन करण्यात आले. अल्पवयात लग्न लावून दिल्यास व त्यास सहकार्य करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई होऊन त्यांना एक लाख रुपये दंड व दोन वर्षे कारावास होऊ शकते याबाबत माहिती देण्यात आली. साेबतच पालकांकडून मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तिचे लग्न करणार असे, लेखी हमीपत्र घेण्यात आले.

बाल कल्याण समिती कक्षाने जानेवारी ते मार्च या तीन महिन्यामध्ये एकूण २४ बाल विवाह रोखले आहे. मे महिन्यात १० तारखेला अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर अनेक बाल विवाह होतात, म्हणून विविध माध्यमाद्वारे बाल विवाह प्रतिबंधासाठी जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक नियोजित बाल विवाहाची जिल्हा बाल संरक्षण कक्षास मिळत आहे.

सोमवारी केलेल्या कारवाईत घाटंजी ठाणेदार निलेश सुरटकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर, पोलीस उपनिरीक्षक किशोर मावस्कर, पोलीस कर्मचारी निलेश घोसे, बाल संरक्षण अधिकारी माधुरी पावडे, क्षेत्रीय कार्यकर्ता कोमल नंदपटेल, चाईल्ड लाईन सुपरवायझर गणेश आत्राम सहभागी झाले होते.

Back to top button