अधिसूचना जाहीर होताच प्रशासन इलेक्शन मोडवर, जिल्हा सीमांवर तपासणी सूरु | पुढारी

अधिसूचना जाहीर होताच प्रशासन इलेक्शन मोडवर, जिल्हा सीमांवर तपासणी सूरु

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात येत्या १९ एप्रिल रोजी मतदान होऊ घातलेल्या नागपूर, रामटेक, वर्धा चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा या पाच लोकसभा मतदारसंघातील निवडणुकी संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने आज बुधवारी (दि. २० मार्च) रोजी अधिसूचना जारी केली. नामांकन अर्ज दाखल करणेही सुरू झाले. अधिसूचना जारी होताच स्थानिक जिल्हा प्रशासन, निवडणूक यंत्रणा कामाला लागली आहे.

संबंधित बातम्या 

आजपासून प्रत्येक जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात खाजगी वाहने थांबवून त्यांची कसून तपासणी सुरू झाली आहे. आज सकाळी ८ वाजल्यापासून शहराच्या चारही सीमांवर हे चित्र पाहायला मिळाले. अमरावती मार्गाने येणाऱ्या वाडी टोलनाका परिसरात खाजगी बसेस, खाजगी वाहनांची कसून तपासणी जिल्हा प्रशासन, निवडणूक यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी स्थानिक पोलिसांच्या मदतीने करताना दिसले.

यासोबतच नागपूर जिल्ह्याच्या सीमावर्ती वर्धा, भंडारा, चंद्रपूर त्यासोबत शेजारच्या मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगडमधून येणाऱ्या वाहनांवरही जिल्ह्याच्या सीमेत येताच प्रशासनाची कडक नजर ठेवली असून त्यांची कागदपत्रासह वाहनांची तपासणी केली जात आहे. वाहन क्रमांक, चालकाचे नाव नोंदवून घेतले जात आहे.

राज्यभरात अनेक ठिकाणी ही मोहीम राबवली जात असून मोठ्या प्रमाणात दारू साठा जप्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर रोज २४ तास ही गाड्यांची तपासणी केली जाणार असून अंमली पदार्थ, स्फोटके, रोख रक्कम किंवा मद्य साठा अशा प्रकारचे कुठलेही आक्षेपार्ह साहित्य आढळून आल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Back to top button