भंडारा: बोथली येथे नाल्यात बुडून मायलेकीचा मृत्यू | पुढारी

भंडारा: बोथली येथे नाल्यात बुडून मायलेकीचा मृत्यू

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : गावालगतच्या नाल्यावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकीचा नाल्यातील खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.१५) सकाळी १०.३०च्या सुमारास बोथली/धर्मापुरी (ता. लाखांदूर)  येथे घडली. सुषमा उर्फ विद्या विजय मेश्राम (वय ३९) असे आईचे तर दिव्या विजय मेश्राम (वय १६) असे मृत मुलीचे नाव आहे.

बोथली परिसरात उन्हाळी पिकाकरीता सोडण्यात आलेले पाणी गावालगतच्या नाल्यात जमा झाल्यामुळे गावातील महिला त्या ठिकाणी कपडे धुण्यासाठी जातात. नेहमीप्रमाणे सुषमा आणि दिव्या या मायलेक कपडे धुवायला नाल्यावर गेल्या होत्या. कपडे धूत असताना दिव्याच्या हातातील टॉवेल सुटून नाल्यातील पाण्यात वाहू लागला. त्यामुळे दिव्या टॉवेल पकडण्यासाठी पाच मीटर पुढे धावली असता, नाल्यापासून काही अंतरावर असलेल्या वनराई बंधाऱ्यातील खोल पाण्यात दिव्या बुडाली. मुलगी बुडत असल्याचे पाहून आई सुषमाने धाव घेतली. मात्र, खोल पाणी व पाण्यावर गवत (वेल) असल्याने ती सुद्धा खोल पाण्यात बुडाली. या घटनेत दोन्ही माईलेकीचा मृत्यू झाला.

त्यांच्यासोबत कपडे धूत असलेल्या दोन महिलांनी या घटनेची माहिती तत्काळ गावात येऊन सांगितली. दिघोरी पोलिसांना माहिती मिळताच ठाणेदार धंदर व इतर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने दोघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. या घटनेमुळे बोथली, धर्मापुरी गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अधिक तपास दिघोरी पोलिस करीत आहेत.

हेही वाचा 

Back to top button