भंडारा-गोंदिया लोकसभेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा, कार्यकारिणीच्या बैठकीत ठराव; भाजप नेते संभ्रमात | पुढारी

भंडारा-गोंदिया लोकसभेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा, कार्यकारिणीच्या बैठकीत ठराव; भाजप नेते संभ्रमात

भंडारा, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा. प्रफुल पटेल यांची राज्यसभेवर निवड झाल्यानंतर भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीत भाजपाचा मार्ग सुकर झाल्याचे बोलले जात होते. परंतु, आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विस्तारीत सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने या क्षेत्रावर पुन्हा दावा केला असून राष्ट्रवादीनेच या क्षेत्रातून निवडणूक लढवावी, असा ठराव पारीत केला आहे. भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या या भूमिकेमुळे भाजपकडून इच्छुक असलेले नेते मात्र संभ्रमात पडले आहेत.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे, आमदार राजू कारेमोरे, धनंजय दलाल, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, अ‍ॅड. विनयमोहन पशिने, अभिषेक कारेमोरे, रिता हलमारे, सरिता मदनकर यांच्या मार्गदर्शनाखाली भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विस्तारीत कार्यकारीणीची सभा आज (दि. 3) घेण्यात आली. या सभेत 7 मार्च रोजी गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत होणार असल्याने हा मेळावा यशस्वी करण्याकरीता कार्यकर्त्यांना संबोधित करण्यात आले. सोबतच भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या चिन्हावर लढावी, असा एकमताने ठराव पारीत करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून खा. प्रफुल पटेल ज्या उमेदवाराला उमेदवारी देतील त्यांच्या आदेशानुसार संपूर्ण पक्ष त्या उमेदवाराच्या पाठीशी राहील, असाही ठराव मंजूर करण्यात आला.

तथापि, खा. प्रफुल पटेल यांची राज्यसभेवर निवड झाल्यानंतर भाजपमधून इच्छुकांनी आपली जोरदार तयारी चालविली आहे. भंडारा-गोंदिया मतदारसंघ आतापासूनच पिंजून काढला जात आहे. अशातच राष्ट्रवादीचा दावा आणि त्यात गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या उपस्थितीत होणारा कार्यकर्ता मेळावा यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचा हेतू काय? या प्रश्नामुळे भाजप नेते संभ्रमात पडले आहेत. असे असले तरी भंडारा-गोंदिया मतदार संघात पक्षाकडून निवडणूक लढण्याबाबत संपूर्ण निर्णय हा खा. प्रफुल पटेल यांच्या हाती असल्याने आता त्यांच्या भूमिकेकडे भाजपसह अन्य पक्षांचे लक्ष लागून आहे.

Back to top button