मनोज जरांगेंची एसआयटी चौकशी गरजेची आहे का?: डॉ. बबनराव तायवाडे | पुढारी

मनोज जरांगेंची एसआयटी चौकशी गरजेची आहे का?: डॉ. बबनराव तायवाडे

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी तावातावाने किंवा भावनेच्या आहारी जाऊन नको, ते वक्तव्य केले. मुळात कुठल्याही आंदोलकांनी भावनिक विधाने टाळावीत, असे आवाहन ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय नेते डॉ. बबनराव तायवाडे यांनी केले आहे.

तायवाडे म्हणाले की, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या भावना दुखावणे स्वाभाविक आहे. योगायोगाने अधिवेशन काळातच हे प्रकार घडल्याने तिन्ही नेत्यांचे समर्थक आमदारांनी विधिमंडळात मुद्दा उचलला म्हणून अध्यक्षांनी एसआयटीचे आदेश दिले. आंदोलकांनी भावनिक होऊन अशी विधाने केल्यास ते निंदनीय आहे. मात्र, एसआयटी बसवून चौकशी करायची, खरचं गरज होती का? हा देखील अभ्यासाचा विषय आहे. यामुळेच मी एसआयटी चौकशीचेही समर्थन करणार नाही आणि जरांगे यांनी केलेल्या वक्तव्याचे देखील समर्थन करणार नाही.

एसआयटी चौकशीतून टर्म ऑफ रेफरन्स काय बाहेर येते? हे पाहावे लागेल. याकडे आम्ही देखील लक्ष ठेवून राहणार आहोत. काही लोकांनी जरांगे यांच्यावर केलेल्या आरोपात तथ्य नसेल व बिनबुडाचे आरोप असेल. तर एसआयटी किंवा अन्य कोणत्याही एजन्सी मार्फत चौकशी झाली तरीही काही होणार नाही. परंतु, संपुर्ण आंदोलनात कोणाच्या सांगण्यावरून काही कृत्य झाले असेल, तर चौकशीतून बाहेर येईल. जरांगे यांना आपल्या वक्तव्याचा पश्चाताप झाला असेल म्हणूनच त्यांनी दिलगिरी व्यक्त केली असावी, असेही तायवाडे म्हणाले.

हेही वाचा 

Back to top button