शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन घेऊन दाखवा: रविकांत तुपकर | पुढारी

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन घेऊन दाखवा: रविकांत तुपकर

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने अधिवेशन बोलावले, ही आनंदाची बाब आहे. पण एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या आधी विशेष अधिवेशन बोलवा आणि शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली काढून दाखवा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केले आहे. न्यायालयाने आज (दि.२१) जामीन मंजूर केल्यानंतर ते बुलढाणा येथे माध्यमांशी बोलत होते.

कांदा निर्यात बंदी उठवा, हे आम्ही आधीपासून सांगत होतो. रात्र गेली निघून आणि सोंग आले मागून, अशी सरकारची अवस्था झाल्याचे  टीकास्त्र  तुपकर यांनी सोडले. शेतकऱ्यांच्या घरातील कांदा निघून गेल्यावर जर तुम्ही कांद्यावरची निर्यात बंदी उठवत असाल, तर शेतकऱ्याला त्याचा काय फायदा होणार आहे. जेव्हा माल शेतकऱ्यांच्या घरामध्ये असतो, तेव्हा ही कांदा निर्यात बंदीच लावायला नको होती, असे आमचे म्हणणे होते. पण, त्यावेळी सरकारने ऐकले नाही. आता उशिरा सुचलेले शहाणपण आहे, त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत नाही. जखम झाली मांडीला आणि पट्टी बांधताहेत डोक्याला अशी परिस्थिती आहे, अशी टीकाही तुपकर यांनी यावेळी केली.

हेही वाचा 

Back to top button