बुलढाणा; पुढारी वृत्तसेवा : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना बुलढाणा शहर पोलिसांनी शनिवारी (दि. २५) दुपारी त्यांच्या राहत्या घरातून अटक केली होती. आज (दि. २५) सायंकाळी पोलिसांनी तुपकर यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. न्यायालयाबाहेर आल्यानंतर तुपकर यांनी मागण्या मंजूर होण्यासाठी आपण आज रात्रीपासूनच अन्नत्याग आंदोलन सुरू करणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
तुपकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आज रात्री ९ वाजल्यापासूनच चिखली तालुक्यातील सोमठाणा गावात अन्नत्याग आंदोलन सुरू करणार आहे. सोयाबीन व कापसाला भाववाढ मिळावी आदी मागण्यांसाठी तुपकर यांनी २० नोव्हेंबरला बुलढाणा येथे एल्गार मोर्चा काढला होता व आपल्या विविध मागण्या शासनाने सात दिवसांत पूर्ण कराव्यात अन्यथा २९ नोव्हेंबर रोजी शेतक-यांना घेऊन मंत्रालय ताब्यात घेण्याचे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या अनुषंगाने शहर पोलिसांनी तुपकर यांना आंदोलन न करण्याविषयी नोटीस बजावली होती. परंतू पोलिसांच्या नोटीसला आपण जुमानत नसून २९ नोव्हेंबरला मंत्रालयात आंदोलन करण्याचा निर्धार कायम असल्याचे प्रसारमाध्यमांतून सांगितले होते. मुंबई येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता पाहता पोलिसांनी रविकांत तुपकर यांना कलम १५१ नुसार आज (दि. २५) दुपारी अटक केली. या अटकेनंतर सायंकाळी त्यांना जामीन मंजूर झाला.