चंद्रपूर: वघाळपेठ येथे विहिरीत पडून अस्वलाच्या पिल्लाचा मृत्यू | पुढारी

चंद्रपूर: वघाळपेठ येथे विहिरीत पडून अस्वलाच्या पिल्लाचा मृत्यू

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा: चिमूर तालुक्यातील वघाळपेठ शेतशिवारातील कठडा नसलेल्या विहिरीत पडून एका अस्वलाच्या पिल्लाचा मृत्यू झाला. ही घटना आज (दि.१९) पहाटे पाचच्या सुमारास वघाळपेठ येथील युवराज सिताराम गुरपुडे यांच्या शेतातील विहिरीत घडली.

चिमूर तालुक्यातील वघाळपेठ शेतशिवारातील कठडा नसलेल्या विहिरीत अस्वलाचा पिल्ल पडल्याची माहिती आज सकाळी नऊच्या सुमारास वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. वनाधिकाऱ्यांचा ताफा लगेच घटनास्थळी पोहोचला. नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. अस्वलाच्या पिल्लाला विहिरीबाहेर काढण्यासाठी रेस्क्यू करण्यात आले. पिल्लाला वाचविण्यासाठी दोर बांधून विहिरीत खाट सोडली. जाळे टाकून काढण्याचा प्रयत्न केला. परंतु लोकांची गर्दी व कल्लोळामुळे पिल्लं खाटेवरून पाण्यात उडी घेत होते. हा प्रकार बराचवेळ सुरू असल्याने पिलं गाळात फसले. त्यामुळे त्याला बाहेर निघता आले नाही. आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर गळ टाकून अस्वलाला बाहेर काढण्यात आले.

सिंदेवाही येथे पशु वैद्यकीय अधिकारी यांच्या मदतीने शवविच्छेदन करण्यात आले. सदर अस्वल हे नर असून त्यांचे अंदाजे वय २ वर्ष होते. अस्वल शेतामध्ये बोरे खाण्यासाठी आलेले असावे. व चुकून विहिरीत पडून मृत्यू झाल्याचा अंदाज वनाधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.
उपवनसरंक्षक दीपेश मल्होत्रा, सहायक वनसंरक्षक सुनील हजारे, यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) के. बी. देऊरकर, क्षेत्र सहाय्यक संतोष औतकर, क्षेत्र सहाय्यक यु. बी. लोखंडे, वनपाल आर. डी. नैताम, गस्तपथक विशाल सोनुने, राहुल भुरले, कालीदास गायकवाड, अक्षय मेश्राम आदींच्या पथकाने रेस्क्यूमध्ये सहभाग घेतला.

हेही वाचा 

Back to top button