

शार्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथील बँक आँफ इडियाचे एटीएम ( BOI ATM ) भस्मसात झाले. १५ लाखाची रोकड व ३५ लाखांच्यावर किमतीचे साहित्याचा समावेश आहे. सुदैवाने एटीएमला लागूनच असलेले बँक कार्यालय आगीपासून वाचले.
येथे महामार्गावर असलेल्या खानोरकर यांच्या इमारतीच्या तळ मजल्यावर बँक आँफ इंडियाचे कार्यालय व एटीएम ( BOI ATM )आहे. बँकेला लागूनच असलेल्या एटीएममधून अचानक धुराचे लोट निघायला सुरूवात झाली. काही कळायच्या आतच एटीएमला आगीने घेरले. हळूहळू आगीने बँकेचे वीज पुवठ्याचे मीटर, स्वीच असलेल्या पेटीला आपल्या कवेत घेतले.
घटनेची माहिती होताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली. कर्मचारी बँक बंद करुन बाहेर पडल्यानंतर पोलिसांच्या मदतीने कसेबसे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. काही नागरिकांनीही त्यांना मदत केली. काही वेळाने आग नियंत्रणात आली. तोपर्यंत संपूर्ण एटीएम मशीन, एसी, मशीन मधील रोकड व अन्य साहित्याची राख झाली होती.
बँकेत काम करणाऱ्या जगदीश नागपुरे याने समयसुचकता दाखवित बँकेत ठेवलेले आग निरोधक सिलेंडर बाहेर आणून आगीवर त्याचा मारा केला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेत ५० लाखांच्यावर नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.