

अकोला, पुढारी वृत्तसेवा : अकोला शहरातील रतनलाल प्लॉट परिसरातील जिल्हा परिषदच्या उर्दू शाळेच्या छतावर आज ( दि. ११) सकाळी नवजात अर्भक व तीन मांसाचे गोळे आढळून आले आहेत. या घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अर्भक व मासाचे गोळे ताब्यात घेऊन ते तपासणीसाठी अकोला शासकीय रुग्णालयात पाठविले आहेत. तीन मांसाचे गोळे अर्भक आहेत की नाही, हे वैद्यकीय अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोला शहरातील रतनलाल प्लांट परिसरातील जिल्हा परिषदच्या उर्दू माध्यमिक शाळेच्या आवारातील मैदानात मुले क्रिकेट खेळत होते. त्यांचा चेंडू शाळेच्या छतावर गेला. चेंडू आणण्यासाठी गेलेल्या मुलांना हे एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये अर्भक आढळून आले. याची माहिती लगेच स्थानिक नागरिकांना मुलांनी दिली. पोलिसांना माहिती देताच सिव्हिल लाईन पोलिस घटनास्थळी पोहचले.
पोलिसांनी हे अर्भक शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. उर्दू माध्यमिक शाळेच्या छतावर हे अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अंदाजे चार ते पाच महिन्याचे हे अर्भक असल्याचे सांगण्यात येत आहे. अर्भक कुणी टाकले, यासाठी पोलीस स्थानिक आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी करणार आहेत.
हेही वाचा