Gadchiroli News : सहायक अभियंत्याकडे १० लाखांची खंडणी मागणारे ४ जण अटक | पुढारी

Gadchiroli News : सहायक अभियंत्याकडे १० लाखांची खंडणी मागणारे ४ जण अटक

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : गडचिरोलीतील एका विभागात कार्यरत सहायक अभियंत्याला ‘हनीट्रॅप’मध्ये अडकवून १० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गडचिरोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नागपुरातून चार जणांना ताब्यात घेतले आहे. रविकांत कांबळे, सुशील गवई, रोहित अहीर अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींमध्ये दोन महिलांचाही समावेश असून, एक महिला फरार आहे. सुशील गवई हा नागपुरात गुन्हे शाखेत पोलिस शिपाई, तर रविकांत कांबळे हा एका पोर्टलचा पत्रकार आहे. Gadchiroli News

पत्रकार रविकांत कांबळे हा कॉर्लगर्लच्या माध्यमातून हनिट्रॅपमध्ये अडकवून १० लाख रुपयांची खंडणी मागत असल्याची तक्रार रविवारी (दि.२८) संबंधित अभियंत्याने पोलिसांत केली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक आव्हाड यांच्या नेतृत्वातील एक पथक नागपूरला रवाना झाले. चौकशीअंती त्यांनी एका महिलेसह चार जणांना ताब्यात घेतले. आज दुपारी चारही जणांना गडचिरोलीत आणण्यात आले. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. Gadchiroli News

४ डिसेंबर रोजी संबंधित सहायक अभियंता नागपुरातील एका हॉटेलमध्ये आरोपी ‘कॉलगर्ल’सोबत गेला होता. शिपाई सुशील गवई हा अभियंत्याचा मित्र असल्याने तोदेखील तेथे हजर होता. ही बाब तिने तिची ओळख असलेल्या नागपुरातील पत्रकार रविकांत कांबळे यास सांगितली. त्यामुळे त्याने ‘कॉलगर्ल’ आणि सुशील गवई यांना हाताशी धरून अभियंत्याला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत १० लाखांची मागणी केली. महिनाभरापासून अभियंत्याकडे पैशासाठी तगादा सुरु होता. यामुळे त्रस्त झालेल्या अभियंत्याने रविवारी गडचिरोली पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यावरून गडचिरोली पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी नागपूर येथे सापळा रचून चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले. दुपारी चारही जणांना गडचिरोलीत आणण्यात आले. पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा 

Back to top button