

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे आपल्या हजारो समर्थकांसह नवी मुंबईत दाखल झाले. राज्याच्या राजधानीत भगवे वादळ घोंगावत असताना उपराजधानीत प्रजासत्ताक दिन कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलन हा अधिकार असला तरी कुठल्याही स्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याचा सबुरीचा सल्ला आंदोलकांना दिला आहे. Devendra Fadnavis
फडणवीस म्हणाले की, न्यायालयाने सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. मात्र कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. उच्च न्यायालयाने आम्हाला जे निर्देश दिले आहेत, कोणालाही आंदोलन करण्याचा अधिकार आहे. आंदोलन शांततेने आणि नियमाने झाले पाहिजे, असे उच्च न्यायालयाने सांगितले आहे. न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जाईल. त्यासोबत जे प्रश्न आहेत, ते प्रश्न कसे सोडवता येतील, याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखाली सरकारचे प्रयत्न सुरु आहेत, असेही फडणवीस म्हणाले. Devendra Fadnavis
प्रजासत्ताकाच्या अमृत महोत्सवाच्या काळात संविधानाने सामान्य नागरिकाला दिलेल्या मूलभूत अधिकारांसोबत मूलभूत कर्तव्यांचे पालन करून देशाला अमृतकाळात विकसित करण्याचे व महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला एक ट्रिलियन डॉलर करण्याचा संकल्प उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आज व्यक्त केला. शेतकरी कल्याण व नागपूरसह विदर्भाच्या विकासासाठी महाराष्ट्र शासन कार्यरत असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे हे ३५० वे वर्ष असून त्यांनी लोकशाहीची संकल्पना प्रत्यक्षात राबवून रयतेचे राज्य निर्माण केले. तसेच प्रभू श्रीरामचंद्रांनी लोकशाही संकल्पनेच्या आधारे रामराज्य निर्माण केले. भारतीय प्रजासत्ताकाचे हे ७५ वे वर्ष साजरे करताना संविधानाने नागरिकांना दिलेल्या मूलभूत अधिकारांसोबत मूलभूत कर्तव्याचे पालन करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना अपेक्षित अमृतकाळातील विकसित भारत निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने आपले दायित्व द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
हेही वाचा