

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : वाहतूकदारांच्या संपामुळे काल सोमवारपासून नागपूरसह राज्यात सर्वत्र पेट्रोलपंपांवर वाहनचालकांच्या रांगा लागलेल्या आहेत.काही ठिकाणी पोलिस बंदोबस्तात पंप सुरू असून अनेकजागी पेट्रोल नसल्याचे फलक लागले आहेत. दरम्यान, नागपूर जिल्ह्यामध्ये सर्व पेट्रोल पंपावर पुरेशा प्रमाणात पेट्रोल, डिझेल व गॅसचा साठा उपलब्ध असल्याचा निर्वाळा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिला आहे. Nagpur News
वाहतूकदारांच्या संपामुळे पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण होण्याच्या भीतीपोटी वाहन चालकांनी पंपांवर गर्दी केली. काही ठिकाणी संप मागे घेण्यात आल्याने काही प्रमाणात ट्रक रस्त्यावर दुपारी धावताना दिसले. काल रात्रभर रांगा होत्या, प्रशासन बोलण्यास तयार नव्हते. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज (दि.२) सकाळी पेट्रोल व गॅस पुरवठा करणाऱ्या सर्व प्रमुख कंपन्या, पेट्रोल डिझेल व गॅस डिलर असोशिएशनच्या नागपूर जिल्ह्याच्या प्रतिनिधींची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे उपस्थित होते. Nagpur News
जिल्हाधिकारी इटनकर यांनी सांगितले की, पेट्रोल पंपांना पुरवठा करणाऱ्या डेपोमध्ये मुबलक साठा उपलब्ध आहे. गरज पडल्यास पोलीस संरक्षणात पेट्रोल पुरवण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी इंधन संपल्याच्या अफवावर विश्वास ठेवू नये. गरज नसेल तर पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गर्दी करू नये, असे आवाहन केले आहे.
या बैठकीमध्ये पेट्रोल डिझल व गॅस डिलर असोशिएशनने नमूद केले की, सदर संपाला आमचा पाठिंबा नाही. स्वतःच्या टँकरने पुरवठा करण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे. यावेळी जिल्हा प्रशासनाकडे त्यांनी पोलीस संरक्षणाची अपेक्षा व्यक्त केली. जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीमधूनच जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्याशी चर्चा करून टँकर धारकांना पोलीस संरक्षणाची हमी दिली.
हेही वाचा